Ayesha Khan Slams To Amaal Malik : ‘बिग बॉस १९’च्या नुकत्याच झालेल्या आठवड्यात अनेक वादविवाद पाहायला मिळाले. फरहाना भट्ट हिच्यावर घरातील सर्व सदस्यांनी निशाणा साधला. टास्कवरून झालेल्या भांडणात अमाल आणि फरहाना यांच्यातील वाद इतके टोकाला गेले की, अमाल मलिकनं फरहानाच्या आईबद्दल वाईट शब्दांचा वापर केला. त्याबद्दल सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली जात आहे.
गुरुवारच्या भागात नीलमसाठी आलेलं घरचं पत्र फरहानानं फाडलं. फरहानानं कॅप्टन होण्यासाठी नीलमच्या कुटुंबीयांनी पाठवलेलं पत्र फाडून टाकलं. ते पाहून अमाल संतापला आणि त्यानं फरहाना जेवत असताना तिच्यासमोरची प्लेट उचलून फेकून दिली. त्यानंतर त्यानं फरहानाच्या आईबद्दल अश्लील शब्द वापरत टीका केली. त्यानंतर घरातील स्पर्धकांनी अमालला सुनावलं. इतकंच नव्हे, तर सोशल मीडियावरही अमालला ट्रोल केलं गेलं.
आयेशा खाननं केली अमाल मलिकवर टीका
अशातच आता अमालच्या या वागणुकीवर आयेशा खाननं तिचा संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आयेशानं अमालच्या वागणुकीवर टीका केली आहे. अमालनं फरहानाच्या आईवर केलेल्या टीकेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ शेअर करीत आयेशा म्हणते, “अत्यंत घृणास्पद आणि घाणेरडं वागणं. यावर कुणीच काही बोलत का नाही, याचं आश्चर्य वाटतंय…”
पुढे आयेशा म्हणते, “मी हा शो नियमित पाहत नाही; पण हे जे सुरू आहे ते खूपच नीच आणि अत्यंत खालच्या दर्जाचं आहे. एका महिलेबद्दल असं वाईट बोलणं, नावं ठेवणं किती चुकीचं आहे. असाच आणखी एक व्हिडीओ पाहिला, त्यात कोणीतरी फरहानाला ‘दहशतवादी’ म्हटलं. हे अत्यंत अयोग्य, निराशाजनक व अपमानास्पद आहे.” त्यानंतर आयेशा फरहानाला पाठिंबा दर्शवीत, “फरहाना, तू भारी आहेस! हा शो नक्की जिंक!” असं म्हणते.

दरम्यान, आयेशासुद्धा ‘बिग बॉस’ची एक्स स्पर्धक आहे. ‘बिग बॉस’च्या गेल्या सीझनमध्ये आयेशानं वाइल्ड कार्ड म्हणून सहभाग घेतला होता. आयेशा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो-व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तसेच ती सोशल मीडियाद्वारे चुकीच्या गोष्टींबाबतही आवाज उठवताना दिसते. अशातच तिनं अमालनं फरहानाच्या आईला उद्देशून असभ्य भाषेतील टीकेचा समाचार घेतला आहे.