Balika Vadhu Actress Shares Wedding Updates : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘बालिका वधू’ आणि मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अविका गौर. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी अविका सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ, तसेच खासगी आयुष्यातील अपडेट्सही शेअर करीत असते.
काही दिवसांपूर्वी अविकाने साखरपुडा झाल्याची गुड न्यूज शेअर केली होती. बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीबरोबर पार पडलेल्या साखरपुड्याचे काही खास क्षण अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. अशातच आता दोघे लवकरच लग्न करणार आहेत.
अविका आणि मिलिंद चंदवानी हे दोघे सध्याचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘पती, पत्नी और पंगा’मध्ये आहेत आणि या शोमध्येच त्यांनी त्यांच्या लग्नाबाबत सांगितलं. विशेष म्हणजे दोघांच्या या खास लग्नसोहळ्याचं थेट प्रसारण ‘पती, पत्नी और पंगा’ या शोद्वारेच होणार आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना अविकानं तिच्या लग्नाबाबत सांगितलं. याबद्दल ती म्हणाली, “कधी कधी सकाळी उठून स्वतःलाच आठवण करून द्यावी लागते की, हे खरंच घडत आहे! मला वाटतं की, मी खूप नशीबवान आहे की, मला असा साथीदार मिळाला. मिलिंद मला कायमच पाठिंबा देतो आणि प्रोत्साहित करतो.” आपलं लग्न प्रेक्षकांबरोबर साजरं करणं ही तिची इच्छा होती, असंही तिनं सांगितलं.
त्याबद्दल अविका म्हणते, “२००८ पासून मी प्रेक्षकांसमोर आहे. त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यातील या खास क्षणात मला प्रेक्षकांनाही सामील करावंसं वाटलं. हे माझं स्वप्न होतं आणि ते खरं होतंय. मी लहान असताना आई-वडिलांना सांगायचे, की मी कोर्टात लग्न करेन आणि कुणालाही कळणार नाही किंवा असं भव्य लग्न करेन की, सगळं जग त्यात सहभागी होईल. आता जसं हे सगळं प्रत्यक्षात घडतंय. त्यामुळे माझं बालपणीचं स्वप्न खरं सत्यात उतरत आहे.”
अविका गौर इन्स्टाग्राम पोस्ट
“जेव्हा सेटवर लग्नाचं आमंत्रण उघडलं, तेव्हा माझी आई फारच भावूक झाली. आता सगळे मिळून सहभागी होत असल्यामुळे हे फक्त आमचं लग्न नाही, तर एक मोठं, पारंपरिक भारतीय लग्न झाल्यासारखं वाटतंय,” असंही अविकानं सांगितलं. दरम्यान, अविका गौर आणि मिलिंद चंदवानी हे दोघं ३० सप्टेंबर २०२५ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.
अविका आणि मिलिंदची भेट २०२० मध्ये हैदराबादमध्ये झाली. त्यानंतर दोघांची चांगली ओळख झाली आणि हळूहळू मैत्रीत झाली. त्यानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आता दोघे एकमेकांचे साताजन्माचे साथी होणार आहेत.