Baseer Ali Reacts On His Eviction From Bigg Boss 19 : ‘बिग बॉस १९’ हा छोट्या पडद्यावरील शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या घरात ट्विस्ट येत असतात. अशातच शोमध्ये एक ट्विस्ट आला, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला. गेल्या आठवड्यात ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. त्यामध्ये प्रणीत मोरे, नेहल चुडासमा, बसीर अली व गौरव खन्ना हे चार सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यापैकी दोघांचा प्रवास संपला. एक म्हणजे बसीर आणि दुसरी नेहल.
प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे बसीर आणि नेहल या दोघांना ‘बिग बॉस १९’च्या घरातून बाहेर पडावं लागलं. ‘बिग बॉस १९’मधून बसीर बाहेर पडणं हे अनेकांच्याच जिव्हारी लागलं आहे. बसीरच्या एक्झिटबद्दल सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याबद्दल बसीरचे चाहते सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. अशातच आता बसीरनं स्वत: त्याच्या एक्झिटबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करीत माझ्यावर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे.
Telly Masala ला दिलेल्या मुलाखतीत बसीर म्हणाला, “माझ्यावर अन्याय झालाय, असं मला वाटत आहे. कारण- नऊ आठवड्यांत माझ्यासाठी काही केलं गेलं आहे. मला काही सांगण्यात आलं आहे, असं आठवतच नाही. माझ्या मदतीसाठी आणि माझा खेळ आणखी सुधारण्यासाठी किंवा मला काही टिप्स देण्यात आल्याच नाहीत. अनेकांनी हा शो पाहिला असेल आणि कुणीही हेच सांगेल की, मला ‘बिग बॉस’च्या घरात योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. उलट मी एकही चूक केली किंवा चुकीचं काही बोललो, तर माझ्यावर टीका केली जायची. तू हे का म्हणालास? तू ते का म्हणालास? तू असं कसं काय बोलू शकतोस? अशी मतंच माझ्याबद्दल व्यक्त केली गेली.”
पुढे बसीर म्हणाला, ” ‘बिग बॉस’मधील माझा प्रवास संपल्याबद्दल मला वाईट वाटलं. त्यामुळे माझ्याबरोबर असं का झालं? याचं माझ्याकडे काहीच उत्तर नाहीय. मी शोचा खूप महत्त्वाचा भाग होतो, असं नाही; पण ‘बिग बॉस’च्या घरात माझं थोडं तरी स्थान होतं. मला काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे होतं. मी कायम घरात सर्वांना म्हणायचो की, काय चाललंय काही कळत नाहीय. बाहेर मी कुणाला आवडतोय की नाही. हेही मला कळत नव्हतं आणि हे प्रेक्षकांनासुद्धा दाखवण्यात आलं आहे. मग मला म्हणायचंय, आता त्याचं उत्तर तरी द्या; पण आता माझा प्रवास संपलाय, आता काय बोलणार?”
बसीर अली इन्स्टाग्राम पोस्ट
बसीर अली आणि नेहल चुडासमा ‘बिग बॉस 19’च्या घरातून बाहेर पडल्याने चाहत्यांसह घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला आहे. बसीर बाहेर येताच नेटकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. “सुरुवातीला तो चांगला खेळत होता”, “बसीरच्या एक्झिटचं खूप वाईट वाटतंय”, ” ‘बसीर ‘टॉप ३’मध्ये तरी हवा होता” या आणि अशा अनेक कमेंट्स करीत नेटकरी बसीरला शोमध्ये पुन्हा आणण्याची मागणी करीत आहेत.
