Bhabiji Ghar Par Hain Fame Actor Shared Struggle Story : मुंबई ही स्वप्ननगरी आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे बाहेरुन लोक इथे येतात तेव्हा ते त्यांच्याबरोबर अनेक स्वप्नही घेऊन येतात. दररोज अनेक जण या शहरात येत असतात. त्यातील कित्येकांना अभिनय क्षेत्रात मोठं नाव कमावण्याची इच्छा असते. कोणाला अमिताभ बच्चन, कोणाला गोविंदा तर कोणाला शाहरुख खान सारखं व्हायचं असतं. परंतु, त्यातील फार कमी लोकांची स्वप्न साकार होतात. असंच काहीसं झालं ‘भाभी जी घर पर हैं’ फेम अभिनेत्यासह.
‘भाभी जी घर पर हैं’ मालिकेत काम केलेला अभिनेता योगेश त्रीपाठी उत्तर प्रदेशहून मुंबईत अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन आलेला. आता त्याला या शहरात येऊन २० वर्षे झाली आहेत आणि आता तो महिन्याला लाखो रूपये कमावतो. याबद्दल त्याने नुकत्याच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
मुलाखतीत योगेश म्हणाला, २००४ साली त्याला अभिनेता व्हायचं होतं म्हणून तो मुंबईत आलेला. त्यानंतर त्याने रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. सुरुवातीली ३ वर्षे तो छोटी मोठी कामं करायचा. १५० रूपयांना तो पेन विकत असे आणि साहाय्यक कलाकार म्हणून काम करायचा ज्यासाठी त्याला १५०० रूपये मिळायचे. २००७ साली त्याने ‘एफआयआर’ या मालिकेत काम केलं आणि यामधून त्याला लोकप्रियता मिळाली. त्यावेळी त्याला २८०० इतकं मानधन असल्याचं त्याने म्हटलं आहे.
योगेश म्हणाला, २०१५ साली टभाभी जी घर पर हैंट या मालिकेपासून त्याचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. यामध्ये त्याने हप्पू सिंह ही भूमिका साकारलेली ज्यासाठी त्याला दिवसाला ८००० इतकं मानधन होतं. परंतु, त्यावेळी त्याचं शूटिंग महिन्यातून फक्त २-३ दिवसच असायचं. त्यामुळे महिन्याला त्याला जवळपास २४००० इतके पैसै मिळायचे. योगेशने सांगितलं की, आता तो दिवसाला ६०००० कमावतो. ‘भाभी जी घर पर हैं’ आणि ‘हप्पू की उल्टन पल्टन’ या दोन्ही ठिकाणी तो एकत्र काम करायचा आणि त्यानुसार त्याला पैस मिळायचे. यामध्ये त्याने तो महिन्याला २४ लाख कमवत असल्याचं म्हटलं आहे.
योगेशने याच मुलाखतीत असं सांगितलं की, आज मुंबईत त्याचे ४ अपार्टमेंट्स आहेत. मुंबईत नवीन असताना तो कित्येक रात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे घालवायचा आणि तेव्हाच त्याने पक्क केलं होतं की एक दिवस तो या शहरात ४ घरं खरेदी करेन. त्याने असंही सांगितलं की, या घरांसाठी त्याने कधीही लोन काढला नाही किंवा कोणाकडूनही पैसे मागितले नाही.