Bharti Singh and Haarsh Limbachiyaa Robbed in Europe : टेलीव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया यांना वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करायला खुप आवडते. जगभरात वेगवेगळी ठिकाणे पाहण्यासाठी ते जगभरातील विविध देशांत भ्रमंती करत असतात. अशातच गेल्यावर्षी त्यांच्याबरोबर युरोप ट्रीपदरम्यान एक विचित्र घटना घडली. इटलीतील फ्लोरेन्समध्ये पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांसह त्यांचे सर्व सामान चोरीला गेले. १० जुलै २०२४ रोजी दिव्यांका आणि विवेक यांच्याबरोबर फ्लोरेन्समध्ये ही घटना घडली होती. अशीच घटना भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्याबरोबरही घडली होती.
दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया यांनी भारती-हर्ष यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी त्यांच्या युरोप ट्रीपदरम्यान झालेल्या चोरीची आठवण व्यक्त केली. तेव्हा भारती आणि हर्ष यांनीही त्यांच्याबरोबर अशीच चोरीची घटना झाल्याचं सांगितलं. यावेळी हर्षने दिव्यांका आणि विवेकला सांगितलं की, हनिमूनसाठी युरोपला गेला होतो आणि तिथे त्याला लुटण्यात आले. त्यांनी सांगितले की अमेरिका आणि युरोपसारख्या शहरांत चोरी किंवा दरोडे हे अगदी सामान्य आहे.
याबद्दल हर्ष म्हणाला की, “जेव्हा मी आणि भारती हनिमूनसाठी गेलो होतो, तेव्हा तिथे मला लुटण्यात आले होते. तिथल्या एका माणसाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला काय हवे आहे असे विचारले. तेव्हा ते ४-५ जण होते आणि त्या परिस्थितीत मी त्यांच्याशी भांडू शकत नव्हतो. चोरी करुन ते निघून गेले होते आणि तेव्हा माझ्याबरोबर नेमकं काय झालं हे मला कळलंच नाही. दोन दिवसांनी मला कळलं की, माझ्या गळ्यात सोन्याची चैन नाही.”
यापुढे तो म्हणाला की, “आमचे नुकतेच लग्न झाले होते; म्हणून आम्ही दोघांनीही हातात हिऱ्याच्या अंगठ्या आणि गळ्यात दागिने घातले होते. आम्ही तेव्हा रोम या शहरात गेलो होतो. ते तुमची बॅग कापून घेऊन जातील आणि तुम्हाला कळणारही नाही. त्या बदल्यात ते तुम्हाला बनावट चलनदेखील देतील. ज्यामुळे तुम्ही आणखी अडचणीत येऊ शकाल. तिथले लोक विशेषतः भारतीयांना लुटतात. त्यांना वाटतं की, तुम्ही श्रीमंत आहात.”
याचबद्दल पुढे अभिनेत्री दिव्यांका म्हणाली, “मी तिथल्या पंतप्रधानांना ट्विट केलं होतं आणि या ट्विटद्वारे मी असं म्हटलं होतं की, बहुतांश भारतीय युरोप दौरा करतात आणि यासाठी ते खूप पैसे खर्च करतात. असं असतानाही तुम्ही भारतीय पर्यटकांचे संरक्षण कसे करू शकत नाही. जे प्रत्यक्षात तुमच्या देशात येत आहेत आणि तुम्हाला पर्यटन व्यवसाय देत आहेत. तिथे त्यांच्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था का नाही.”
यापुढे तिचा पती विवेक दहिया म्हणाला की, “रोम हे चोरी करणाऱ्यांचं केंद्र आहे.” त्यानंतर हर्षनेही त्याच्या सर्व चाहत्यांना विनंती केली की, “जर तुम्ही युरोपला आणि विशेषतः रोमला जात असाल तर तुम्ही स्वत:ची आणि तुमच्या मौल्यवान सामानाची काळजी घ्यावी. कारण अशा शहरांमध्ये चोरी किंवा दरोडे हे अगदी सामान्य आहे.”