Bhau Kadam on competition: भाऊ कदम हे त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी आणि विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखले जातात. फक्त संवादच नाही, तर त्यांच्या हावभावांनीदेखील ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात त्यांनी विविध भूमिका साकारत भरपूर मनोरंजन केले. त्याबरोबरच त्यांनी काही चित्रपटांतदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘झेंडे’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक होताना दिसत आहे.

“अशी भीती वाटत…”

आता भाऊ कदम यांनी एका मुलाखतीत अभिनय क्षेत्रातील स्पर्धेबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांनी ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की, आपली इंडस्ट्री अशी आहे, ज्यामध्ये खूप स्पर्धा आहे. तर तुम्हाला अशी कधी भीती वाटते का, मी काळानुरूप बदललो नाही, तर मी इंडस्ट्रीमधून बाहेर फेकला जाईन. त्यावर भाऊ कदम म्हणाले, “नाही. अशी भीती वाटत नाही. कारण- दादा कोंडकेसाहेबांचं उदाहरण आहे. त्यांनी ती स्टाईल केली, जी लोकांना आवडायची. तर माझं काम लोकच बघणार आहेत आणि तेच ठरवणार आहेत.”

“लोकांचं म्हणणं असतं की, आम्हाला तुम्ही वेगळं काही देऊ नका. आपण वेगळं करायला गेलो की, लोकांना ते आवडत नाही. त्यांना तेच आवडतं, जे त्यांना हवंय आणि मी ते देतो. आता काही लोकं वेगळं करायला गेले, तर त्यामध्ये ते फसले आहेत. मी इंडस्ट्रीतल्या लोकांना दाखवेन की, मला अमुक अमुक गोष्टी येतात. पण, प्रेक्षकांना ते बघायचं नाही. लोक म्हणतील की, तू विनोदी करतोस, तर विनोदी कर. त्यामुळे जे मला येतं, तेच मी करीत राहणार आहे. वेगळं करायला गेलं तर मी कदाचित फसेन.

पुढे ते म्हणाले, “मी एका मालिकेत एका एपिसोडमध्ये काम केलं होतं. ‘मधु इथे चंद्र तिथे’ नावाची केदार शिंदेंची मालिका होती. त्यामध्ये मी आंधळ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. तर ती पाहिल्यावर मला सचिन पिळगांवकरांचा फोन आला होता. भूमिका छान केली आहेस, म्हणून त्यांनी कौतुक के होतं. तेव्हा मला लोक ओळखत नव्हते. पण, आता मी जर करायला गेलो, तर कदाचित लोकांना आवडणार नाही. आता लोकं मला ओळखायला लागली आहेत. आता सुरुवात झाली आहे. त्यांना विनोदी बघायचं आहे. अजून १०-१२ वर्षांनी आपण असं म्हणू शकतो की आपण काहीतरी वेगळं करूयात. तोपर्यंत लोकांनाही वाटेल की भाऊ कदमच काहीतरी वेगळं काम बघूया.

“ते आनंदाचंच काम…”

एक कलाकार म्हणून असं कधी वाटलं आहे का की, कॉमेडी करून कंटाळा आला आहे का? यावर अभिनेते म्हणाले, “असं कधीच वाटलं नाही. कारण- हे काम माझ्या आवडीचं आहे. विनोद हा नेहमी स्वत:ला आणि इतरांनाही हसत ठेवतो. ते आनंदाचंच काम आहे, ते दु:खाचं नाही. गंभीर भूमिकांचा कंटाळा येऊ शकतो. किती रडायचं आहे, असं वाटू शकतं. विनोदी भूमिकांचा कधी कंटाळा येईल, जेव्हा समोर स्क्रिप्ट येते आणि त्यात विनोद नसतात. काही पंच पटत नाहीत, तरी ते बोलायचे असतात. त्याचा कंटाळा येतो. नाही तर विनोदाचा कंटाळा कधीच येऊ शकत नाही, असं मला वाटतं”, असे म्हणत भाऊ कदम यांनी विनोदी भूमिका साकारायला आवडतात, असे सांगितले.