Bhau Kadam Praise Dr. Nilesh Sabale : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपूरे, सागर कारंडेसह अनेक कलाकार प्रसिद्ध झाले. २०१४ साली सुरु झालेल्या या कार्यक्रमाने तब्बल १० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी निलेश साबळेने सांभाळली होती.
‘चला हवा येऊ द्या’नंतर निलेश साबळे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला. यानंतर तो आता लवकरच त्याचा नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल भाऊ कदम यांनी नुकत्याच एका मुलाखतीत माहिती दिली.
भाऊ कदम यांनी मुलाखतीत निलेश साबळेबद्दल गौरवोद्गार काढले. तसंच त्याच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना करत असल्याचं भाऊ कदम म्हणाले. मुक्कामपोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांनी निलेश साबळेचं, त्याच्या कामाचं कौतुक केलं. तसंच निलेश साबळेच्या आगामी सिनेमाबद्दलही माहिती दिली.
यावेळी भाऊ कदम म्हणाले, “निलेश साबळे माझा मित्रच आहे. तो खूपच प्रामाणिक आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आता त्याचा नवा सिनेमा घेऊन येत आहे, ‘चंद्रकांता’ असं नाव आहे. खूप मोठा सिनेमा आहे. खूप मोठी कास्टिंग आहे. मला माहीत नाही, तो कसं करेल. कारण साबळे पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे. याचं लिखाणही त्याने केलं आहे आणि त्यात अभिनयसुद्धा केला आहे.”
यापुढे भाऊ कदम सांगतात, “हे सगळं त्याला झेपेल का? याची मला काळजी होती. त्यामुळे त्याने हे एकदा केलं आणि त्याला यश मिळालं, तर मग त्याला मागे फिरायची गरज नाही. त्याला यशस्वी व्हावं, असं मला मनापासून वाटतं. जे टॅलेंट त्याने महाराष्ट्राला दाखवलं आहे, ते जगाने बघावं. त्यामुळे माझी त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना आहे. ते झालं पाहिजे. कारण त्याने आम्हाला यशस्वी केलं, तर तोही यशस्वी झाला पाहिजे. आम्ही पडद्यावर दिसतो; पण लेखक-दिग्दर्शक दिसत नाहीत. त्यामुळे तो दिसला पाहिजे असं मला वाटतं.”
भाऊ कदम इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे भाऊ कदम म्हणाले, “त्याने डॉक्टरकी केल्यामुळे १२-१४ तास काम केलं, तरी त्याला कळत नाही. तो एकदा लिखाण करायला बसला की, कितीही वेळ बसू शकतो. तो डॉक्टरकी करताना हुशार होताच. त्यामुळे लेखन करतानाही फक्त दोन तास झोपतो. त्याच्या डोक्यात सतत तेच असतं. तुम्ही त्याला एखादा सिनेमा बघितला का? असं विचारलं तर त्याला माहीत नसतं.”
पुढे भाऊ कदम म्हणतात, “तो माझ्या जवळच राहतो. पण मला कधीच तो बाहेर कुठे जाताना-फिरताना वगैरे दिसत नाही. आमच्याबरोबर अनेकदा परदेश दौऱ्यात तो आला आहे; पण तिथेही तो रूममध्ये गेला की, स्वत:ला बंद करून घ्यायचा. आम्ही इतक्या देशांत फिरलो. शूटिंगनंतरही आम्ही बाहेर फिरायला जायचो. पण तो कुठेच नाही. फिरत असतानाही त्याच्या डोक्यात तेच. म्हणून तर इतकं लिहिलं गेलं.”