‘चिडिया घर’, ‘भाभीजी घर पर है’सारख्या मालिकेतून झळकणारी आणि ‘बिग बॉस ११’ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे काही ना काही कारणास्तव चर्चेत असते. बऱ्याचदा वेगवेगळ्या वादामध्ये शिल्पा अडकते. सिद्धार्थ शुक्लाने ‘बिग बॉस हिंदी १३’च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर शिल्पाने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. २०२० मध्ये सिद्धार्थ बिग बॉस हिंदीचा विजेता ठरला होता. त्यानंतर शिल्पाने एका मुलाखतीत सिद्धार्थ शुक्लाबाबतच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं होतं.
शिल्पा ज्या प्रोजेक्टशी जोडली जाते त्यात काही ना काहीतरी विघ्न येतात. नुकतंच सब टीव्हीवरील ‘मॅडम सर’ मालिकेच्या निर्मात्यांशी तिचे काही कारणास्तव खटके उडाल्याची बातमी समोर येत आहे. एकूणच या मालिकेतील भूमिकेबद्दल नीट माहिती दिली नसल्याने हे खटके उडाल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात ‘नवभारत टाइम्स’या वेबसाईटशी चर्चा करताना तिने याबद्दल खुलासा केला आहे.
आणखी वाचा : अक्षय कुमार व जॉन अब्राहम ही जोडी पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार? ‘या’ चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा
याबरोबरच मुलाखतीमध्ये शिल्पाने कास्टिंग काउचविषयीही भाष्य केलं आणि तिचा अनुभव शेअर केला आहे. शिल्पा म्हणाली, “फक्त बॉलिवूड किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येच नव्हे तर अशा मानसिकतेची लोक सगळीकडेच असतात. सगळेच आजमावून बघायचा प्रयत्न करतात. माझ्या बाबतीतसुद्धा असं घडलं आहे, फक्त मी आत्ता त्याबद्दल बोलू इच्छित नाही कारण आत्ता बोलून काहीच फायदा नाही. जे असेल ते त्याच वेळी बोलणं आणि कृती करणं गरजेचं असतं. इंडस्ट्रीत बलात्कार होत नाही, सगळं सगळ्यांच्या मर्जीनेच होतं.”
पुढे ‘बिग बॉस’मधील स्पर्धक साजिद खानबद्दलही शिल्पाने भाष्य केलं. ती म्हणाली, “साजिद खान यांच्याबद्दलही मी तेव्हा माझं मत मांडलं होतं. त्यानंतर कित्येक चाहते नाराजही झाले. त्यात काहीच गैर नाही. तुमच्याबरोबर एखादी घटना घडली असेल तर त्याच वेळी त्याविषयी बोला, तक्रार करा, जिथे तुम्हाला योग्य वाटत नाही तिथे तुम्ही काम करू नका, तिथून काढता पाय घ्या.” अशा पद्धतीने शिल्पाने याविषयी तिचं परखड मत मांडलं आहे.