बिग बॉसच्या १६ व्या सीझनचा आज महाअंतिम सोहळा आहे. मराठमोळ्या शिव ठाकरेसह प्रियांका चौधरी, शालीन भानोत, एमसी स्टॅन, अर्चना गौतम हे स्पर्धक विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. शिव ठाकरे या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशात आता प्रेक्षकांसह मराठी कलाकारांनीही शिव ठाकरेला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉस मराठी फेम अभिनेता अभिजीत केळकरनेही शिव ठाकरेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता अभिजीत केळकर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. नेहमीच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना आणि आपल्या कामाचे अपडेट देताना दिसतो. पण आता मात्र त्याने शिव ठाकरेचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. शिव ठाकरेने याआधी मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचं विजेतेपद जिंकलं आहे. त्यानंतर आता बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्ये अगदी सुरुवातीपासूनच त्याने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशा शिव ठाकरेसाठी अभिजीतनं खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा- Bigg Boss 16 Grand Finale 2023: कधी, कुठे आणि कसा पाहता येणार बिग बॉसचा महाअंतिम सोहळा? जाणून घ्या
अभिजीत केळकरची पोस्ट-
“…शिवा,माझ्या छोट्या भावा, आज तुझ्यासाठी मोठा दिवस आहे, तसाच आमच्यासाठी पण मोठा दिवस आहे… तू फक्त स्वप्नं पाहत नाहीस, ती पूर्ण करण्याचा ध्यास असतो तुला आणि म्हणूनच ती पूर्ण होतात, तुझ्यातली ही सकारात्मक ऊर्जाच तुझं एक एक स्वप्नं सत्यात उतरवते आहे… आई, बाबा, आजी, ताई, सगळ्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद तुझ्या मागे आहेतच, आज ट्रॉफी तर आपल्याच घरी येणार… अशीच मोठ- मोठी स्वप्नं पाहत राहा,तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवोत, तथास्तु. खूप प्रेम भावा…”
दरम्यान बिग बॉस हिंदीच्या महाअंतिम सोहळ्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना मत देताना दिसत आहेत. बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. यामुळे सोशल मीडियावर सध्या यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदा बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठीचा सोळावा सीझन कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आणखी वाचा- “प्रत्येक नवऱ्याची अवस्था…”, प्रसाद ओकचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
कधी, कुठे आणि कसा पाहता येणार?
बिग बॉस १६ चा महाअंतिम सोहळा १२ फेब्रुवारीला म्हणजे आज पार पडणार आहे. आज बिग बॉस हिंदीचा शेवटचा भाग प्रदर्शित केला जाणार आहे. याच भागात बिग बॉसचा विजेता घोषित केला जाईल. सलमान खान या महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहे. कलर्स वाहिनीवर रात्री ९ वाजता बिग बॉस हा कार्यक्रम तुम्हाला पाहता येणार आहे. त्याबरोबरच तुम्ही Voot अॅपवर देखील हा शो पाहू शकता.