Abhishek Bajaj Ex Wife’s Post : अभिनेता अभिषेक बजाज सध्या ‘बिग बॉस १९’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. शोमधील त्याचा खेळ आतापर्यंत अगदी उत्तम सुरू होता. त्याच्या खेळाचं कौतुकही होत आहे; पण गेले दोन दिवस तो काही कारणांसाठीही चर्चेत आला आहे आणि त्यामधील एक कारण म्हणजे त्याचं वैवाहिक आयुष्य. अभिषेक बजाजचं एक लग्न झालं असून, तो आणि त्याची पत्नी विभक्त झाले आहेत.

मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात त्याची अशनूर कौरबरोबर जवळीक वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये मैत्रीचं नातं असलं तरी त्यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा होताना दिसत आहे. त्याबद्दल नुकत्याच झालेल्या वीकेंड का वारमध्येही सलमाननं अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अशातच आता त्याची एक्स पत्नी आकांक्षा जिंदाल हिनं त्याच्यावर काही धक्कादायक आरोप केले आहेत. तिचं म्हणणं आहे की, अभिषेकनं तिचा विश्वासघात केला होता.

आकांक्षानं अभिषेकवर निशाणा साधत त्याला ‘खोटारडा’ म्हटलं आणि तो सत्य लपवत असल्याचा आरोपही केला आहे. रविवारी (२ नोव्हेंबर) आकांक्षानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘बिग बॉस’मधील नुकत्याच झालेल्या भागाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात अभिषेक त्याच्या भूतकाळाबद्दल गौरव खन्नाशी बोलताना दिसत आहे. त्यात गौरव अभिषेकला म्हणतो, “तू हे मान्य कर. बोल की हो हे झालं आहे आणि विषय संपव. तुला कोणी काही बोलणार नाही. कोणीच तो X आहे की Y आहे या चर्चा करणार नाही.”

अभिषेक आणि गौरव यांच्या या संभाषणाचा हाच व्हिडीओ शेअर करीत आकांक्षानं लिहिलंय, “तो (अभिषेक) फक्त चांगला असल्याचं नाटक करतो आणि लोकांना जे ऐकायचं असतं, तेच बोलतो. तो आयुष्यभर सत्य लपवत आला आहे आणि हेच आमच्या घटस्फोटाचं खरं कारण आहे. त्यानं मला आणि इतर महिलांनाही दुखावलं आहे. सलमानसरांसमोरही तो सहजपणे खोटं बोलतो. खोटं बोलायला त्याला कसलाच संकोच वाटत नाही.”

पुढे तिनं लिहिलंय, “स्वतःचं खरं वय आणि वैवाहिक आयुष्याबद्दल माहिती लपवणं… यातून हेच दिसतं की, तो किती मोठा खोटारडा आहे… तो टीव्हीवर लोकांना चुकीचं पटवून देतो आहे. गेल्या १५ वर्षांपासून त्याचा हा पॅटर्न बदललेला नाही. तो नेहमी हाच खेळ खेळतो. आता ‘बिग बॉस’च्या घरातही तो २१ वर्षांच्या अशनूर कौरबरोबर इतिहासाची पुनरावृत्ती करीत आहे. त्याला लाज ही गोष्ट माहीतच नाही, असं दिसतं.”

अभिषेक बजाजवर आरोप करत एक्स पत्नीनं शेअर केली पोस्ट

अभिषेक बजाजची एक्स पत्नी आकांक्षा जिंदालची इन्स्टाग्राम स्टोरी
अभिषेक बजाजची एक्स पत्नी आकांक्षा जिंदालची इन्स्टाग्राम स्टोरी

शेवटी आकांक्षानं म्हटलं, “मी इथे कोणतंही नाटक किंवा सूड घ्यायला आलेली नाही. मला फक्त सत्य बाहेर यावं, असं वाटतं. जसं तुम्ही इतर स्पर्धकांबद्दल मोकळेपणानं बोलता तसं.” दरम्यान, नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खाननं विनोदी पद्धतीनं सूचित केलं की, आकांक्षा वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करू शकते. त्याचबरोबर त्यांनी अभिषेकला इशारा देत सांगितलं की, त्याची एक्स पत्नी बाहेर त्याच्याबद्दल बोलत आहे.