Bigg Boss 19 Contestant Tanya Mittal’s Ex Boyfriend Exposes Her : ‘बिग बॉस १९’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामधील स्पर्धक व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल ही पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात ती अनेकदा तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसते. ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यापूर्वी तिने दिलेल्या मुलाखतीत तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दलही सांगितलेलं. अशातच तिच्या एक्स बॉयफ्रेंडनेही तिच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात जाण्यापूर्वी तान्याने दिलेल्या एका मुलाखतीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘जनसत्ता’च्या वृत्तानुसार यामध्ये ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल म्हणाली की, “२०१८ साली माझं ब्रेकअप झालेलं आणि त्याने मला मी सुंदर दिसत नाही असं सांगितलेलं, यामुळेच त्याने माझ्याशी ब्रेकअप केलं. माझ्यासाठी त्यापेक्षा दुसरी कोणतीही महत्त्वाची गोष्ट नव्हती.”
तान्या म्हणाली, “मी माझं शिक्षण सोडलं होतं, त्यामुळे कुटुंबाचाही विरोध होता. मला असं वाटलेलं की जर कोणीही माझी साथ दिली नाही तर निदान तो माझ्याबरोबर असेल. मी जर काहीच करू शकले नाही तर मी त्याच्याशी लग्न करेन आणि आम्ही कायम एकत्र राहू.”
‘बिग बॉस १९’ फेम तान्या मित्तलच्या एक्स बॉयफ्रेंडचा खुलासा
तान्या मित्तलचा एक्स बॉयफ्रेंड बलराज सिंहने आता नुकतीच तिच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत यामध्ये तान्याबद्दल सांगितलं आहे. बलराज तान्याबद्दल म्हणाला, “आपली मैत्री टिकली नाही, कारण तू खोटारडी आहेस. तुझी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे समाधान. तुला एखाद्याला काही सांगावंसं वाटलं की तू त्याला मित्र बनवतेस, तुझं म्हणणं त्याला सांगून स्वतःचं समाधान करतेस आणि नंतर त्याला सोडून देऊन त्याच्याशी खूप वाईट वागतेस.”
तान्याने ती चांदीच्या भांड्यातून पाणी पिते असं म्हटलेलं. बलराजने याबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “असं नाहीये, तिने प्लास्टिकच्या बॉटलनेही पाणी प्यायलं आहे आणि काचेच्या ग्लासातूनही. गमतीत बोललेलं समजू शकतो, पण लवकरच तुझा खरा चेहरा समोर येणार आहे.” यामध्ये त्याने ‘बिग बॉस’चे प्रेक्षक हुशार आहेत असं म्हणत तान्याला तिला घरात टिकून राहायचं असेल तर तिला खोटी इमेज तयार करण्यापेक्षा खरं वागण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, तान्याबद्दल बोलायचं झालं तर ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून इन्स्टाग्रामवर तिचे २.५ मिलियन इतके फोलॉअर्स आहेत. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. याव्यतिरिक्त तिचा स्वत:चा व्यवसायही आहे. सध्या ती ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळत आहे.