Bigg Boss 19 Eviction : ‘बिग बॉस १९’ हा शो सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. सुरुवातीपासूनच या शोची आणि शोमधील स्पर्धकांची चर्चा होती. आता जसजसा खेळ पुढे जात आहे, तितकाच तो अधिक स्पर्धात्मक आणि कठीण होत आहे; त्यामुळे या घरात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धकांना खेळात आणि वागणुकीत आपला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागत आहे.

एकेक करून या स्पर्धेतून सदस्य बाहेर पडत आहेत. अशातच या आठवड्यातही घरातले चार उत्तम स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. हे चार स्पर्धक म्हणजे गौरव खन्ना, प्रणीत मोरे, नेहल चुडासमा आणि बसीर अली. हे चौघे सुरुवातीपासूनच उत्तम खेळ खेळत आहेत, त्यामुळे यातून घराबाहेर नक्की कोण जाणार? याची बिग बॉसच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच या आठवड्यात घरातून दोन स्पर्धक बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

चेन टास्कनंतर अमाल मलिक आणि शहबाज यांनी असे म्हटले होते की, “या वेळेला प्रणीत घराबाहेर जाईल,” पण आता गेम पलटला आहे; कारण प्रणीत नव्हे तर नेहल आणि बसीर हे दोघे घराबाहेर जाणार आहेत. कमी मतांमुळे दोघांना शोमधून बाहेर जावं लागत आहे, याबद्दलची माहिती ‘फिल्म विंडो’ने दिलं आहे. बसीर अली आणि नेहल चुडासमा आता शोचा भाग राहिलेले नाहीत.

बिग बॉसच्या घरात या दोघांनी सुरुवातीला मैत्री दाखवली, पण नंतर दोघे एकमेकांचे विरोधक झाले. जेव्हा त्यांचा खेळ प्रेक्षकांना भावेनासा झाला, तेव्हा त्यांनी ‘लव्ह अँगल’ तयार करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील इतर सदस्यांनी हे ‘फेक’ असल्याचे म्हटलं आणि आता अखेर दोघांचा प्रवास संपणार आहे.

बसीर अली यापूर्वी अनेक रिॲलिटी शोमध्ये दिसला आहे, त्यामुळे त्यानं सुरुवातीपासूनच खूप सावधपणे खेळ सुरू केला होता. घरातील सदस्यांनी त्यांना अनेकदा सांगितले की, “तू इतर शोमध्ये जसा खेळलास, तसाच इथेही आत्मविश्वासाने खेळ.” पण हळूहळू त्याचा खेळ मंदावला. त्यात झीशान कादरी घरातून गेल्यानंतर त्यांचा गेम पूर्णपणे फिका पडला आणि आता अखेर त्याला या घरातून बाहेर जावं लागणार आहे.

BB Insider HQ या एक्स पोस्टनुसार, अमालच्या शोमधून बाहेर पडण्याच्या चर्चादेखील होत आहेत. या पोस्टनुसार, ‘बिग बॉस १९’मधून अमाल बाहेर पडू शकतो आणि त्यामागचं कारण त्याचं आरोग्य असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात बसीर, अमाल आणि नेहल यांच्या ‘बिग बॉस १९’मधील एविक्शनबाबतच्या या चर्चा आहेत, या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, या घरातून नक्की कोण बाहेर जाणार? हे येत्या ‘वीकेंड का वार’मध्येच प्रेक्षकांसमोर येईल.