Hina Khan Shares Post For Ashnoor Kaur : ‘बिग बॉस १९’मध्ये नुकत्याच झालेल्या एका भागात तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांनी अशनूर कौरची शरीराबद्दल वाईट कमेंट केली होती. अभिनेत्रीच्या वाढत्या वजनावर टीका करीत तान्या आणि नीलम यांनी तिचा उल्लेख हत्ती व डायनोसॉर, असा केला होता. तसेच आईसारखी दिसते, असंही म्हटलं होतं. अशनूरबद्दलच्या या टीकेवर इंडस्ट्रीतील अनेकांनी अशनूरच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या होत्या आणि तान्या व नीलम यांच्यावर टीका केली होती.
तसेच सलमान खाननं याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करावी, असंही अनेकांनी म्हटलं. ‘वीकेंड का वार’मध्ये या चुकीबद्दल सलमाननं तान्या व नीलम यांना झापलंही होतं. अशातच आता अभिनेत्री व ‘बिग बॉस’ची एक्स स्पर्धक हीना खाननं अशनूरसाठीची खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून हीनानं या टीकेला धीरानं सामोरे गेल्याबद्दल अशनूरचं कौतुक केलं आहे. तसेच सलमानचेही तिने आभार मानले आहेत. तसेच या पोस्टमधून तिनं स्वत:चा अनुभवही शेअर केला आहे.
या पोस्टमध्ये हीना खान म्हणते, “मी या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’ची वाट बघत होते आणि म्हणूनच मी अशनूरवरील शारीरिक आणि असंवेदनशील टीकेबद्दल माझा राग व्यक्त केला नव्हता. कारण- मला ठाऊक होतं की, या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानही तिच्याबद्दल नक्की प्रतिक्रिया देईल. धन्यवाद सलमान! हा विषय इतक्या संवेदनशीलतेने, संयमाने व सहानुभूतीने हाताळल्याबद्दल…”
त्यानंतर हीना अशनूरबद्दल म्हणते, “फक्त २१ वर्षांच्या एका मुलीच्या उंची, वजन व रूपावर पुन्हा पुन्हा टीव्हीवर तिचेच काही सहस्पर्धक टिप्पणी करीत आहेत, ज्या वय आणि अनुभवानं तिच्यापेक्षा खूप मोठ्या आहेत. हे अत्यंत लाजिरवाणं आहे; पण अशनूरबद्दल मला खूप अभिमान वाटतो. तिनं हे सगळं इतक्या शांतपणे, समजुतीनं हाताळलं. ती हवं तर हे प्रकरण वाढवू शकली असती… पण तिनं काहीही नाटक केलं नाही, खोटे अश्रू नाहीत, सहानुभूती मिळवायचा प्रयत्न नाही आणि प्रसिद्धीसाठी त्याचा वापरही केला नाही. कारण- ती तशी नाही. हेच तिच्यावरील संस्कार आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब आहे.”
त्यानंतर हीना खान म्हणते, “आपलं रूप, शरीररचना व आरोग्य हे नेहमी आपल्या आयुष्याच्या निवडींवर अवलंबून नसतं. कधी कधी ते आपल्या Genes वरही असतं. हे मी स्वतः अनुभवलं आहे. विशेषतः स्त्रियांना हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या सहन कराव्या लागतात. मूड स्विंग्स, थकवा, अनियमित मासिक पाळी, वजन वाढणं किंवा कमी होणं, त्वचा कोरडी होणं, तसेच मधुमेह, थायरॉईड, स्थूलपणा आणि असे अनेक आजार होण्याची शक्यता असते.”
अशनूर कौरवरील बॉडी शेमिंगबद्दल हिना खानची पोस्ट
त्यानंतर हीना सांगते, “आपण आपलं जेनेटिक्स बदलू शकत नाही आणि त्यामुळे त्याचे परिणामही आपल्यालाच भोगावे लागतात. स्वतःचं शरीर आणि शरीराच्या समस्याांशी लढणं किती कठीण असतं हे मला माहीत आहे. ते आयुष्य बदलून टाकणारं आणि अनेकदा नैराश्य आणणारं असतं. जेव्हा ते Gene मध्येच असतं, तेव्हा त्याचा परिणाम काय होतो, हे मला विचारा. हो… आपण सगळे चुका करतो. मीसुद्धा केल्या आहेत; पण जेव्हा तीच चूक पुन्हा पुन्हा केली जाते आणि त्याबद्दल पश्चात्तापही नसतो, तेव्हा ते फक्त एक सोईस्कर वर्तन असतं. ज्यांना हे मान्य नाही, त्यांना थोडी सहानुभूती लाभो आणि जगात सगळीकडे प्रेम असावं, असं मनापासून वाटतं.”
