Bigg Boss 19 Contestant Luxury Lifestyle : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. मराठीसह हिंदीमध्येही ‘बिग बॉस’चे अनेक चाहते आहेत. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनची जोरदार चर्चा होत असते. अशातच हिंदी ‘बिग बॉस १९’ नुकताच सुरू झाला आहे. या शोप्रमाणेच शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धकही चांगलेच चर्चेत आहेत.

शोमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तान्या मित्तल. ग्वाल्हेरची उद्योजक, इन्फ्लुएन्सर व मॉडेल म्हणून लोकप्रिय असलेली तान्या मित्तल सध्या ‘बिग बॉस १९’मधील सर्वांत चर्चेतील स्पर्धकांपैकी एक आहे.

काही दिवसांपूर्वी तान्याने ‘बिग बॉस’च्या घरात ती ५०० पेक्षा जास्त साड्या, ५० किलो दागिने आणि स्वतःचे चांदीचे भांडे व बाटली घेऊन आल्याच्या चर्चा झाल्या होत्या. अशातच आता तान्याने शोमध्ये पुन्हा स्वत:च्या आलिशान जीवनशैलीबद्दल वक्तव्य केले आहे, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या भागात तान्या नीलम गिरीबरोबर गप्पा मारत होती. यावेळी तान्या नीलमला म्हणाली, “येथे लोकांना काहीच माहीत नाही; मी कॉफी पिण्यासाठी ग्वाल्हेरहून आग्र्याला जाते, तिकडे कॉफी घेते; पित नाही. कारण- मला थंड कॉफी लागते; त्यासाठी मी माझ्याबरोबर एक आइस-बॉक्सही ठेवते. त्यानंतर आग्र्याला एक गार्डन आहे, तिथे जाऊनच मी कॉफी पिते. जर मला महिन्याला तीन कॉफी हव्या असतील, तर हा सगळा व्याप मी करते. हे सगळं माझं बेसिक रूटीन आहे.”

तान्याने पुढे सांगितले, “माझं बिस्कीट लंडनहून येतं. दर दोन महिन्यांनी मला माझं बिस्कीट कोणीतरी आणून देतं. नाही तर मला रडायला येतं. माझ्या आयुष्यात बिस्कीट नाही. गोड नाही… काय नाही… काय करू?”

पुढे तान्या सांगते, “मी दिल्लीतील एका हॉटेलचीच डाळ खाते, बुखारा डाळ. मी ग्वाल्हेरहून सहा तास प्रवास करून ती डाळ खायला जाते, नसेल तर मी उपाशी राहते. सकाळपासून खाणं-पिणं बंद. रागानं स्टाफला सुट्टी देते. मग ग्वाल्हेरहून विमानानं दिल्लीला जाते आणि डाळ खाऊन रात्री परत येते.”

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यावरून तान्याबद्दल अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “कुणीतरी तिला शांत करावं अशी विनंती”, “Sunio from Gwalior”, “अंबानींनी हे ऐकलं तर त्यांना रडू येईल”, “मी इतकं काही ऐकू शकत नाही”, “हिच्याबद्दल मी समस्त ग्वाल्हेरकडून माफी मागतो”, “तान्याइतकं श्रीमंत व्हायचं आहे” अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

१५० बॉडीगार्ड, ५०० हून अधिक साड्या, पाण्यासाठी स्वत:ची चांदीची बाटली… या आणि अशा अनेक दाव्यांमुळे घरातील सदस्य त्रस्त झाले होते. पण, आता अनेक जण तिच्या या वक्तव्यांबद्दल मजा घेतात आणि कधी कधी तिच्यावर विनोदही करतात.