Pranit More Amaal Malik Fight Video : टेलीव्हिजनवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये दररोज स्पर्धकांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडणे होत आहेत. अशातच प्रणित मोरे आणि अमाल मलिक यांच्यात दुपारच्या जेवणावरून बाचाबाची झाली. याचाच एक प्रोमो समोर आला आहे.

‘बिग बॉस’च्या घरात अमाल आणि प्रणित हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण आता या दोन मित्रांमध्ये फूट पडणार असल्याचं चित्र दिसत आहे. कारण जेवणावरुन अमाल आणि प्रणितमध्ये वाद झाला असून या वादाचा एक प्रोमो समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये अमाल दुपारचं जेवण उशीर होणार असल्याचं सांगत तुम्ही आता वोट करा असं सर्वांना सांगतो. त्यानंतर सगळेजण त्यांची मतं व्यक्त करताना दिसतात. यावरून नेहल मी आता जेवण करणार नसल्याचं म्हणते, हीच गोष्ट अमाल प्रणितला जाऊन सांगतो. त्यावर प्रणित अमालला उत्तर देत, “मीसुद्धा उशीराच जेवतो. पण सगळेजण लवकर जेवणार असतील तर मला चालेल” असं म्हणतो.

मात्र यावर अमाल त्याला “तू कधीच कोणत्या गोष्टीसाठी पाठिंबाच देत नाही” असं म्हणतो. यावरून त्यांच्यात बाचाबाची होते. पुन्हा अमाल प्रणितला येऊन म्हणतो की, “तुम्ही कधी तरी एका मुद्द्यावर या. तूच या घरातला सगळ्यात मोठा ट्रेंड सेटर आहेस.”

यावर प्रणितही त्याला उत्तर देत ‘तू तुझ्या मर्जीने नियम करतोस’ असं म्हणतो. यानंतर अमाल प्रणितच्या जवळ येऊन त्याच्याशी वाद घालु लागतो. यालाच विरोध करत प्रणित त्याला “तू कॅप्टन आहेस तर नीट बोल. मी तुला सगळं सांगतो. पण तू दूर हो. दूर राहून बोल” असं म्हणतो.

‘बिग बॉस १९’ प्रोमो

जेवणाच्या छोट्याश्या कारणावरून अमाल प्रणितशी वाद घालत असल्याचं या प्रोमोमधून तरी दिसत आहे. मात्र अमालने त्याला चांगलंच उत्तर दिलं आहे. दरम्यान, या व्हिडीओवर अनेकांनी प्रणितची बाजू घेतली आहे. कमेंट्समध्ये प्रणितच्या चाहत्यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसत असलेली प्रणित आणि अमाल यांच्यातील बाचाबाची आणखी टोकाला जाणार का? दोघे चांगले मित्र असल्याने या मैत्रीत फुट पडणार का? की दोघे एकमेकांना समजुन घेणार? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.