Watch Live Streaming Of Bigg Boss Season 19 : ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सगळ्यात वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या शोमध्ये मनोरंजन विश्वातील विविध सेलिब्रिटी सहभागी होतात. गेल्या काही दिवसांपासून हिंदी ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. यंदा घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार? हा सीझन प्रेक्षकांना कुठे पाहायला मिळणार? जाणून घेऊयात…

दरवर्षीप्रमाणे ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाचं होस्टिंग सुद्धा बॉलीवूडचा भाईजान सलमान खान करणार आहे. यंदा ‘बिग बॉस’ची थीम ही राजनीतीवर आधारित असेल. तसेच शोच्या नियमांमध्ये अनेक बदल देखील करण्यात आले आहेत.

‘बिग बॉस’चा १९ वा सीझन प्रेक्षकांना टेलिव्हिजन टेलिकास्टच्या आधी ओटीटीवर पाहता येणार आहेत. टीव्ही टेलिकास्टच्या जवळपास ९० मिनिटं आधी हा शो प्रेक्षकांना जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहे. आजचा ग्रँड प्रिमियर प्रेक्षक जिओहॉटस्टारवर रात्री ९ वाजता पाहू शकतात आणि त्यानंतर कलर्स वाहिनीवर याचं १०:३० वाजता प्रसारण करण्यात येईल.

Bigg Boss 19 संभाव्य स्पर्धकांची यादी

स्क्रीनने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या १९ व्या पर्वात गौरव खन्ना, अशनूर कौर, अमाल मलिक, अवेज दरबार, नगमा मिराजकर, दिनो जेम्स, तान्या मित्तल, कुनिका सदानंद, झैशान क्वादरी, प्रणित मोरे आणि नतालिया स्टॅन्कोस्झेक हे स्पर्धक सहभागी होणार आहे. तसेच अपूर्वा मुखिजा, अरबाज पटेल, हंसिका मोटवानी, अली असगर आणि शैलेश लोढा यांचीही नावे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये चर्चेत आहेत पण, यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.

Bigg Boss च्या घरात प्रवेश केल्यावर स्पर्धकांची दोन संघांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. यावर्षी घरातील सदस्यच महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत. तर हा शो पुढे नेण्यात, नॉमिनेशन प्रक्रियेत प्रेक्षकांचा मोठा वाटा असेल. याचं उदाहरण सांगायचं झालं, तर शहनाद गिलचा भाऊ शेहबाज आणि कंटेंट क्रिएटर मृदुल तिवारी यांच्यापैकी घरात कोण सहभागी होणार यासाठी प्रेक्षकांकडून मतं घेण्यात आली होती. आता प्रेक्षकांनी भरघोस मतांनी निवड केलेला सदस्य घरात एन्ट्री घेणार आहे.