गेली अनेक वर्षे सलमान खान ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शोचा होस्ट म्हणून काम करतोय. आता तर ‘बिग बॉस’ व सलमान खान हे समीकरणच झालंय. दरवर्षी ‘बिग बॉस’चे नवीन पर्व येते आणि दरवर्षी सलमान खानच्या मानधनाची हमखास चर्चा होते. १९ व्या सीझनसाठी सलमानने १२० ते १५० कोटी रुपये मानधन घेतलंय, असं म्हटलं जातंय. आता बिग बॉस १९ चे निर्माते ऋषी नेगी यांनीच याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

इंडिया टुडेशी बोलताना ऋषी नेगी म्हणाले, “सलमान खान जवळपास सर्वच एपिसोड बघण्याचा प्रयत्न करतो. पण जर त्याला सर्व एपिसोड पाहणं शक्य झालं नसेल तर आम्ही वीकेंडला त्याच्याबरोबर बसून घरातील एक-दोन तासांचे फुटेज बघतो. ज्यामध्ये आठवड्याभरात झालेल्या महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेण्यात येतो. बिग बॉसच्या घरात काय घडतंय याची सलमानला पूर्ण कल्पना असते. त्याच्या ओळखीतले बरेच जण हा शो पाहतात आणि त्याला एपिसोडबद्दल फीडबॅक देण्यात येतो. त्या सर्व गोष्टींवरून तो त्याचं मत तयार करतो. निर्माते म्हणून आमचीही मतं असतात. तसेच प्रेक्षकांकडूनही फीडबॅक येतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मग वीकेंड का वारचे एपिसोड तयार केले जातात.”

निर्माते सांगतात तेच बोलतो सलमान खान?

सलमान खानला प्रॉडक्शन टीमकडून जे सांगण्यात येतं तेच तो स्टेजवर बोलतो, अशीही टीका अनेकदा त्याच्यावर होते. याबद्दल ऋषी नेगी म्हणाले, “सलमानला जे लोक ओळखतात त्यांना माहीत आहे की, त्याला त्याच्या मनाविरुद्ध काहीही बोलायला लावणं शक्य नाही. ती विशिष्ट गोष्ट बरोबर आहे की चूक यावर त्याचे स्वतःचे मत असते. मग त्याबद्दल आम्ही चर्चा करतो आणि मग आम्ही शूटिंग करतो.”

सलमान खानला प्रत्येक पर्वासाठी १५०-२०० कोटी मिळतात?

बिग बॉस सुरू झालं की दरवर्षी सलमान खानच्या मानधनाची चर्चा हमखास होते. प्रत्येक पर्वासाठी सलमान खानला १५०-२०० कोटींचं मानधन मिळतं, अशी चर्चा होते. त्याबद्दल ऋषी नेगी म्हणाले, “मानधनाबाबत सलमान आणि जिओ हॉटस्टारमध्ये करार झाला आहे, त्यामुळे त्याच्या मानधनाबाबत मला माहिती नाही. पण त्याला जितके पैसे मिळतात, त्याचा तो हकदार आहे. माझ्यासाठी तर तो वीकेंडला तिथे असतो, हीच मोठी गोष्ट आहे.”

प्रत्येक पर्वात सलमान खान पुढचा सीझन करणार नाही, असं म्हणतो. याबद्दल ऋषी नेगी यांनी प्रतिक्रिया दिली. “मला वाटतं की आता त्याचा या शोबरोबर एक भावनिक बंध झाला आहे. स्टेजवर तो ज्या पद्धतीने बोलतो, चर्चा करतो, प्रत्येक गोष्टीत सहभागी होतो, सर्वच मुद्द्यांवर बोलतो, हे सगळं तो मनापासून करतो. पुढचा सीझन करणार नाही, असं म्हणूनही तो दरवर्षी हा शो करतो, याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो. दरवर्षी शो सुरू होण्याआधी आम्ही सगळे एकत्र येतो, त्याच्याशी चर्चा करतो, त्याला सगळी सविस्तर माहिती देतो,” असं ऋषी नेगी यांनी नमूद केलं.