Bigg Boss 19 Salman khan Bashes Pranit More : ‘बिग बॉस १९’ सुरू होऊन जवळपास आठवडा झाला असून, आता या पर्वाचा पहिला ‘वीकेंड का वार’ पार पडणार आहे. अशातच या कार्यक्रमातील आगामी भागाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ‘वीकेंड का वार’ला सलमान खान स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरेला जाब विचारताना दिसत आहे.
‘बिग बॉस १९’मध्ये कलाकारांपासून ते सोशल मीडिया एन्फल्युएन्सरपर्यंत अनेक जण सहभागी झाले आहेत. त्यामध्ये स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरेदेखील सहभागी झाला आहे. अशातच ‘जिओ हॉटस्टार’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सलमान खान प्रणीत मोरेसह बोलताना दिसत आहे. प्रणीतने ‘बिग बॉस १९’च्या घरात येण्यापूर्वी त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोदरम्यान सलमान खानबद्दल जोक्स मारले होते. त्यावेळी ते सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. अशातच आता अभिनेत्याने त्याबद्दल त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सलमान खानने प्रणीत मोरेला विचारला जाब
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सलमान खान म्हणाला, “प्रणीत स्टँडअप कॉमेडियन… मला माहीत आहे तू माझ्याबद्दल काय काय बोलला आहेस आणि ते बरोबर नव्हतं. माझ्यावर तू जे जोक्स मारलेस, ते पाहता, तू जर आता इथे माझ्या जागी असतास आणि मी बिग बॉसच्या घरामध्ये असतो, तर तू काय केलं असतंस? तुला लोकांना हसवायचं होतं; पण तू माझं नाव वापरून ते केलंस. तू मर्यादा ओलांडायला नव्हती पाहिजे”.
‘बिग बॉस १९’च्या घरात पहिल्याच आठवड्यात ‘वीकेंड का वार’ला सलमान खान प्रणीत मोरेची शाळा घेणार का? प्रणीतने ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यापूर्वी सलमानवर केलेला विनोद त्याला महागात पडेल का? त्यावर सलमान खानची नेमकी काय भूमिका असेल हे येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. ‘बिग बॉस १९’ या पर्वातील पहिल्या ‘वीकेंड का वार’ला प्रणीतबरोबर अजून कोणत्या स्पर्धकांबद्दल सलमान खान बोलणार किंवा तो कोणाची शाळा घेणार हे पाहणं रंजक ठरेल.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत त्याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी त्यांनी प्रणीतबद्दल “प्रणीत तू आला नाहीस, तर बिग बॉसच्या घरात तुला आणण्यात आलंय”, “सलमान खानच्या पुढे कोणी बोलू शकत नाही” अशा कमेंट्स केल्या गेल्याचं पाहायला मिळतं.