Bigg Boss 19 Amaal Malik : ‘बिग बॉस १९’ हा शो आणि शोमधील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत येत आहेत. या शोमध्ये प्रसिद्ध संगीतकार व गायक अमाल मलिकसुद्धा सहभागी झाला आहे. या शोमधून तो खेळासह वैयक्तिक आयुष्यातील अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहे. नुकत्याच एक भागात त्यानं काका आणि बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांचा ‘दुष्ट माणूस’ असा उल्लेख केला होता.

त्याचबरोबर काका अनु मलिक यांनी माझ्या वडिलांना कायमच डावललं, असंही अमालनं म्हटलं होतं. मात्र आता अमालचे दुसरे काका अबू यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अमालच्या वक्तव्यानंतर SCREEN ने अमालचे दुसरे काका अबू मलिक यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमालच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.

अबू मलिक म्हणाले, “अमाल ‘बिग बॉस १९’मध्ये खूपच चांगला खेळ खेळत आहे. तो रडतो, भांडतो, भावना व्यक्त करतो. त्यामुळे तो शो जिंकू शकतो; पण घरातील वाद जनतेसमोर मांडणं योग्य वाटत नाही. प्रत्येक घरात वाद होतात; पण त्याचा अर्थ असा नाही की, नातं तुटलं आहे. आम्ही अजून एकत्र आहोत आणि गरज भासल्यास एकमेकांसाठी उभे राहू.”

पुढे ते म्हणतात, “अमाल खूप संवेदनशील मुलगा आहे. हे आरोप त्यानं ठरवून केले आहेत, असं मला वाटत नाही; पण त्याच्या मनात अनेक वर्षांपासूनचा राग आहे आणि हा राग तो आता व्यक्त करीत आहे. अमालनं अलीकडच्या काही महिन्यांत खूप मानसिक त्रास सहन केला आहे. त्यानं घरच्यांशी नातं तोडलं असल्याचंही जाहीर केलं. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात; पण त्याची अशी चर्चा करणं योग्य नाही. प्रत्येक घरात काही ना काही बोललं जातं; पण ते बाहेर आणण्यासारखं नसतं. त्यात अमाल अधूनमधून नवीन गोष्टी सांगतोय, हे मला विचित्र वाटतं.”

अमालनं ‘बिग बॉस १९’मध्ये आरोप केला की, अनु मलिक यांनी अमालच्या वडिलांना फक्त खोटं खोटं गाणं गाण्यासाठी म्हणून बोलावलं. त्यावर अबू मलिक म्हणाले, “मला या घटनेबद्दल काही माहिती नाही आणि त्यामुळे त्यावर मी काही बोलू शकत नाही. घरामध्ये काही गोष्टी होतातच, त्याचा इतका ऊहापोह करणं चुकीचं आहे. मी या गोष्टींमध्ये पडत नाही.”

तसेच, अमालनं अनु मलिक यांनी भरपावसात त्याला रस्त्यावर सोडलं होतं, असा दावाही केला होता. या घटनेबाबत अबू मलिक यांनी सांगितलं, “तेव्हा जुहूमध्ये सगळीकडे पाणी भरलं होतं. सर्व पालक काळजीत होते. कदाचित अनु आणि अमाल एकमेकांना पाहू शकले नसतील. अमाल खूपच संवेदनशील आहे आणि या घटनेबाबत त्याच्या कानावर काही चुकीच्या गोष्टी पडल्या असतील, ज्यावर त्यानं विश्वास ठेवला असेल.”

त्यानंतर अबू मलिक यांनी अमालचे वडील डब्बू यांच्याबरोबरच्या नात्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. त्याबद्दल अबू म्हणाले, “माझं आणि डब्बूचं चांगलं नातं होतं; पण तरी अरमानच्या लग्नाला मला आमंत्रण दिलं गेलं नाही. मी तेव्हा स्वित्झर्लंडमध्ये होतो. माझ्या मुलीनं मला लग्नाची माहिती दिली. त्यामुळे मी दुखावलो आणि नंतर मी त्यांच्यापासून स्वतःच दूर राहिलो.”