Bigg Boss 19 First Promo Of Salman Khan : ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सगळ्यात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या शोमध्ये मनोरंजन विश्वातील विविध सेलिब्रिटी सहभागी होतात. गेल्या काही दिवसांपासून हिंदी ‘बिग बॉस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशा चर्चा सुरू होत्या. अखेर हिंदी ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाचा पहिला प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाचं होस्टिंग सुद्धा बॉलीवूडचा भाईजान सलमान खान करणार आहे. प्रोमो लॉन्च होण्याआधीच सलमानने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘मिलते हैं एक नए मैदान मैं’ अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. यामुळे अभिनेता राजकारणाच्या दिशेने आपली पावलं वळवत तर नाहीये ना? अशा चर्चा रंगल्या होत्या.
मात्र, यानंतर काही तासांतच ‘कलर्स वाहिनी’ व ‘जिओ हॉटस्टार’ने ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाचा पहिला प्रोमो शेअर केला आणि चाहत्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. याशिवाय सलमानने राजकीय संकेत देणारी स्टोरी का पोस्ट केली होती याचाही उलगडा झाला आहे.
यंदा ‘बिग बॉस’ची थीम ही राजनीतीवर आधारित असेल. सलमान यात म्हणतो, “मित्र आणि शत्रू दोघांनी लक्ष द्या…स्वत:ला तयार ठेवा कारण, यावेळी असेल घरातील सदस्यांचं राज्य… मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी ‘बिग बॉस’चा नवीन सीझन घेऊन आलोय. ‘इस बार चलेगी घरवालों की सरकार’ ही यंदा शोची टॅगलाइन असणार आहे.
Bigg Boss 19 केव्हा सुरू होणार?
बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन येत्या २४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो रात्री १०:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. प्रेक्षक ‘बिग बॉस १९’ ‘कलर्स टीव्ही’ आणि ‘जिओ हॉटस्टार’वर पाहू शकतात.
दरम्यान, शो सुरू होण्यापूर्वी यंदा घरात कोण-कोण प्रवेश करणार याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे. मीरा देओस्थले, लता सभरवाल, अपूर्वा मुखिजा, पुरव झा, नील मोटवानी, अरहान अन्सारी, शशांक व्यास, खुशी दुबे, शरद मल्होत्रा, मून बॅनर्जी, राम कपूर आणि गौतमी कपूर हे सेलिब्रिटी यंदा ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वात सहभागी होणार असल्याची दाट शक्यता आहे. ‘कलर्स वाहिनी’कडून अद्याप सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही.