Arti Singh Supports Pranit More : ‘बिग बॉस १९’ सुरू होऊन आता तीन महिने व्हायला आले आहेत. हळूहळू हा शो फिनालेच्या दिशेनं जात आहे. शो जिंकण्यासाठी स्पर्धक मेहनत करताना दिसत आहेत. शोमधील स्पर्धकांना बाहेरूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. अशातच आता एक्स ‘बिग बॉस’ स्पर्धकानं प्रणितला पाठिंबा दिला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री व ‘बिग बॉस’ची एक्स स्पर्धक आरती सिंगनं प्रणित मोरेला सपोर्ट केला आहे. अभिनेत्रीनं त्याच्या खेळाचं कौतुक केलं. बॉलीवूड बबल टेली या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये आरतीनं प्रणित मोरेच्या ‘बिग बॉस १९’मधील खेळाचं कौतुक केलं. तसंच त्यानंच हा शो जिंकावा, असंही तिनं म्हटलं आहे.
आरती म्हणाली, “मला वाटतं प्रणितनंच हा शो जिंकला पाहिजे. मला त्याचा गेम आवडत आहे. तो शोमध्ये कायम इतरांना हसवत असतो. एखाद्याला टोमणा मारायचा असेल तरीही तो त्याच्या विनोदी शैलीत उत्तर देतो. त्याचा स्वभावही खूप छान आहे. त्याचं घरातील स्पर्धकांबरोबरचं बॉण्डिंग छान आहे. त्यामुळेच मला तो आवडतो आणि मी त्यालाच सपोर्ट करीत आहे. मला वाटतं की, तोच या शोचा विजेता झाला पाहिजे. जो या खेळात आपली प्रतिष्ठा राखत आहे, जो इतरांचा आदर करत आहे. तोच या शोचा विजेता झाला पाहिजे.”
प्रणित मोरे इन्स्टाग्राम पोस्ट
त्यानंतर आरतीनं ‘बिग बॉस’च्या घरातून नुकत्याच बाहेर पडलेल्या मृदुल तिवारीबद्दलही तिचं मत व्यक्त केलं. मृदुलबद्दल आरती म्हणाली, “मृदुलही खूप छान स्पर्धक आहे. तोसुद्धा खेळात कायम भान ठेवून खेळत होता. टास्कसाठी कधी त्यानं आरडाओरडा केला नाही. टास्कदरम्यान कुणाला मागे खेचण्यासाठी त्यानं आपला गेम खेळला नाही. किंवा टीआरपीसाठी त्यानं कधी मुद्दाम भांडणं केली नाहीत. त्यानं कायमच त्याच्या मर्यादा राखल्या. तसंच आता मला प्रणितबाबत जाणवत आहे. त्यामुळे मला आता प्रणित आवडत आहे. त्याचा गेम आवडत आहे. त्यामुळे तोच शो जिंकला पाहिजे, असं वाटतं.”
दरम्यान, शिव ठाकरे, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत केळकर हेही प्रणितला सपोर्ट करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातील त्याचा मनमिळाऊ स्वभाव, विनोदी शैली, टास्कदरम्यानचा संयम या त्याच्याबाबतच्या गोष्टी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. सोशल मीडियावरही प्रणितचे चाहते त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. आता बिग बॉस १९ चा विजेता कोण होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
