अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची जोडी ‘बिग बॉस’मुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. जुलै महिन्यात गुपचूप साखरपुडा उरकत या दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. १८ नोव्हेंबरला प्रसाद-अमृताचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. सध्या त्यांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झालेली असून अमृताच्या मेहंदी सोळ्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
अमृता देशमुखने खास मेहंदी सोहळ्यासाठी फुलांचे दागिने, पिवळ्या रंगाचा भरजरी ड्रेस, डोक्यावर तिआरा असा लूक केला होता. अभिनेत्रीने मेहंदी सोहळ्याचे बरेच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रसाद जवादेने होणाऱ्या बायकोसाठी खास “अमृतमय जाहलो…” असा संदेश हातावर लिहून घेतल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. परंतु, या सगळ्यांमध्ये अमृताच्या हातावर रेखाटलेल्या एका फोटोने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा : सिद्धार्थ चांदेकरने ‘या’ नावाने सेव्ह केला आहे मिताली मयेकरचा फोन नंबर, बायकोबद्दल म्हणाला, “ती पहिल्यांदा…”
अमृताने तिच्या मेहंदीच्या डिझाईनमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात प्रसादबरोबर एकत्र एन्ट्री घेतानाचा फोटो रेखाटून घेतला आहे. अभिनेत्रीच्या मेहंदीवर बिग बॉस’चा लोगो रेखाटून त्या खालोखाल एका जोडप्याचं चित्र काढलेलं आहे. या जोडप्याच्या हातात बिग बॉसच्या घरातील नावाच्या पाट्या दिसत आहेत. मेहंदीसाठी अशाप्रकारची हटके डिझाईन काढून अमृताने वर्षभरापूर्वीच्या शोमधील आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. ही मेहंदी काढण्यासाठी तब्बल ४ तास लागल्याचं अमृताने शेअर केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान, अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे उद्या म्हणजेच १८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. या कार्यक्रमातील मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात होऊन आता लवकरच अमृता-प्रसाद एकत्र एका नव्या आयुष्याची सुरूवात करणार आहेत.