टेलीव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय जोडपं म्हणजे अभिनेता प्रिन्स नरुला व त्याची पत्नी युविका चौधरी. प्रिन्स व नरुला यांनी गेल्यावर्षी चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली होती. लग्नाच्या ६ वर्षानंतर प्रिन्स व युविका यांनी १९ ऑक्टोबर रोजी मुलीला जन्म दिला. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. अशातच आता या जोडप्याबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे दोघांनी पुन्हा एकदा विवाहगाठ बांधली आहे.
युविका आणि प्रिन्स यांच्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या सात वर्षांनी लेकीच्या जन्मानंतर हे दोघे पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं आहे आणि या लग्नाबद्दल युविकाने यूट्यूबवर एक व्लॉग व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. ‘माझे दुसरे लग्न’ असं शीर्षक असलेला व्लॉग व्हिडीओ तिने शेअर केला आहे, ज्यात तिने साधा अनारकली ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये प्रिन्स गंमतीने म्हणतो की, त्याचे अपहरण करण्यात आले आहे आणि त्याला लग्न करण्यास भाग पाडण्यात आले आहे. युविका आणि प्रिन्स यांच्या नोंदणीकृत विवाहासाठी युविकाचा भाऊ आणि बहीण साक्षीदार म्हणून उपस्थित होते. तर यावेळी युविकाची बहीण गंमतीने प्रिन्सबद्दल असं म्हणते, “आता जीजू कायमचे बंधनात अडकले आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना हे लग्न नाकारता येणार नाही. मी त्यांना अडकवले आहे.”
लेकीच्या जन्मानंतर प्रिन्स आणि नरुला यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या नात्यात काही कारणांनी आलबेल नसल्याचं म्हटलं जात होतं. शिवाय युविकाने गेल्यावर्षी २४ नोव्हेंबर रोजी प्रिन्सच्या वाढदिवसानिमित्त पोस्टही शेअर केली नव्हती. पण कालांतराने युविकाने एका मुलाखतीत असं काहीही झालं नसल्याचं सांगितलं होतं आणि त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टता दिली होती.
दरम्यान, ‘बिग बॉस ९’पासून युविका व प्रिन्स यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. प्रिन्स युविकापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. ‘बिग बॉस’मध्ये प्रेमात पडल्यानंतर काही वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले आणि मग २०१८ साली दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षांनी या दोघांनी मुलीला जन्म दिला. युविका व प्रिन्स यांच्या लेकीचं नाव ‘एक्लीन’ असं आहे. युविका व प्रिन्स दोघेही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.