Bigg Boss 19 updates : ‘बिग बॉस’च्या शोमध्ये स्पर्धकांची एकमेकांशी होणारी भांडणं काही नवीन नाहीत. अनेकदा टास्कदरम्यान, स्पर्धक एकमेकांशी वाद घालताना दिसतात. नुकत्याच झालेल्या भागात अमाल मलिक, प्रणीत मोरे आणि बसीर अली या तिघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
अमाल आणि प्रणीतमधील भांडणात बसीरने उडी घेतली आणि नंतर प्रणीत व बसीर दोघे एकमेकांशी वाद घालू लागले. या वादाला धक्काबुक्कीचं स्वरूपही आलं. भांडणादरम्यान, अमालने अनेकदा प्रणीतच्या अंगाला स्पर्श केला. तसंच बसीरही त्याच्या अंगावर धावून जाताना दिसला.
या दरम्यान प्रणीत दोघांना वारंवार अंगाला स्पर्श करू नका असं सांगत होता. मात्र, अमाल आणि बसीर तरीही त्यांच्या शरीराला वारंवार स्पर्श करताना दिसले. नुकत्याच झालेल्या भागात हे भांडण आणखी वाढलं असल्याचं पाहायला मिळालं. यात स्पर्धकांनी एकमेकांना शिवीगाळसुद्धा केली.
यावेळी बसीरने प्रणीतला नॉमिनेटेड असल्याने हा मुद्दाम भांडण करत असल्याचं म्हटलं. त्यावर प्रणीतने “तू माझ्याशी चुकीच्या पद्धतीने बोललास” असं म्हटलं. त्यावर बसीर पुन्हा त्याला ‘घरी जा’ असं म्हणतो. या भांडणादरम्यान, बसीर पुन्हा प्रणीतला स्पर्श करतो आणि त्याला “तू तुझ्या गावी जा” असं म्हणत चिडवतो. त्यावर प्रणीतही त्याला “मी गावावरून आलो असलो, तरी माझ्या स्वत:च्या हिमतीवर इथे आलो” असं ठणकावून सांगतो.
त्यानंतर बसीर प्रणीतला, “पुन्हा तू उगाच हीरो बनण्याचा प्रयत्न करू नकोस” असं म्हणतो. त्यानंतर बसीर त्याला ‘कुरूप’ म्हणून चिडवतो. दोघांमधील वाद सुरू असतानाच कॅप्टन ‘बिग बॉस’कडे दोघांमधील भांडणाची तक्रार करतात. त्यानंतर बसीर पुन्हा प्रणीतला तू माझ्याबद्दल असुरक्षित असल्याचं म्हणतो. तसंच प्रणीतही स्वत: कॅमेऱ्यासमोर येत त्याला वारंवार स्पर्श केल्याबद्दल ‘बिग बॉस’कडे याची नोंद घेतली जावी अशी मागणी करतो.
याबद्दल प्रणीत असं म्हणतो, “बिग बॉस… या घरात एकमेकांना स्पर्श करण्याची परवानगी नसतानाही पुन्हा पुन्हा वारंवार स्पर्श केला जात आहे. शोमध्ये येण्याआधी कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं गेलं होतं की, एकमेकांना स्पर्श करायचा नाही, म्हणून मी शांत आहे; यापुढे मी हे खपवून घेणार नाही, तुम्हाला यावर काय ती कार्यवाही करावीच लागेल.”
दरम्यान, प्रणीतला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहेत. अनेकजण त्याच्या बाजूने आहेत. ‘बिग बॉस मराठी ५’मधील धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर प्रणीतला पाठिंबा देत आहेत. तसंच काही मराठी कलाकार मंडळीसुद्धा प्रणीतच्या बाजूने सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.