यंदा बिग बॉसचे चौथे पर्व विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून त्यात दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि त्यांचा खेळ यावरुन बिग बॉसचे चौथे पर्व गाजताना दिसत आहे. मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या पर्वाची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री करणारी स्पर्धक ठरली आहे. बिग बॉसच्या घरात येताच स्नेहलता सुरुवातीला भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता मात्र ती चांगलीच मुरलेली दिसत आहे.

नुकतंच बिग बॉसच्या घरात ‘खुल्ला करायचा राडा’ हे साप्ताहिक कार्य पार पडले. यात टीम बी विजयी ठरली. यावेळी किरण माने, अमृता धोंगडे आणि विकास हे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी किरण मानेंनी स्नेहलता वसईकरचा एक किस्सा सांगितला. तिच्यामुळे एक मालिका बंद पडली, असेही ते यावेळी म्हणाले.
आणखी वाचा : ऐतिहासिक पात्र, बोल्ड फोटो अन् रोखठोक स्वभाव असलेल्या स्नेहलता वसईकरबद्दल माहितीये का?

स्नेहलताबद्दल बोलताना किरण माने म्हणाले, “तिचे सेटवर इतके नखरे असायचे की तिने एका चॅनलला सळो की पळो करुन सोडलं होतं. सेटवर कधीच वातावरण चांगलं नसायचं. १० वर्षांपूर्वी मी जायचो आणि परत यायचो. मी माझं काम करायचो आणि परत यायचो. वर्षभर मी कसंतरी सहन केलं. दर आठवड्याला मिटींग असायची. त्यात ते सेटवरची भांडण मिटवायचे. परत ही काही तरी सुरु करायची. दहा दिवसांनी चॅनलवाले यायचे, सेट काय चाललंय, कोणाचं कोणाशी पटत नाही. ही भांडण लावण्यात सर्वात पुढे असायची.”

“त्यावेळी त्या मालिकेचा टीआरपी फार चांगला होता. मात्र यामुळे ती मालिका बंद पडण्याच्या मार्गावर आली. यानंतर मात्र मी भडकलो. त्यावेळी मी सेटवर कधीही न बोलणारा माणूस बोलायला लागला, हे बघून तिला धक्का बसला. त्यावेळी मी समोर खुर्चीवर बसून तिला फार बडबडलो. तिच्यावर संतापही व्यक्त केला”, असेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा : “मी कोणालाही घेतलं…” छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड करण्याबद्दल महेश मांजरेकर स्पष्ट बोलले

“आज इतकी चांगली मालिका तुझ्यामुळे बंद पडते. इतक्या लोकांच्या पोटावर पाय आला तो तुझ्यामुळे आला. तिला उद्या लगेच काम मिळेल. पण बाकीच्याचे काय??” असा प्रश्नही मी त्यावेळी उपस्थित केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवल्यापासून सदस्यांमध्ये दोन ग्रुप पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतत कोणाची ना कोणाची तरी भांडण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यामुळे बिग बॉसचा कार्यक्रम दिवसेंदिवस मजेशीर होताना दिसत आहे.