बिग बॉस हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणून त्याकडे पाहिले जाते. यंदा बिग बॉस मराठीची रंगत दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये अनेक राडे, भांडण, सतत होणारे वाद पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातून निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे यांच्यापाठोपाठ योगेश जाधव घराबाहेर पडला. बिग बॉसच्या घरातील जेंटल जाईंट अशी त्याची ओळख होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर योगेश जाधवने मेघा घाडगेने केलेले आरोप खोडून काढले.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मेघा घाडगेने योगेश जाधववर खरपूस टीका केली होती. “योगेशचा पहिल्या दिवसापासून त्याच्या तोंडावर अजिबात ताबा नाही. मी त्याला वेळोवेळी सावध केलं आहे. तू जे बोलतोस ते सगळंच मी ऐकून घेऊ शकत नाही. तू थोडं तोंड साभाळून बोलत जा, असे मेघा घाडगेने म्हटले होते. त्यानंतर आता योगेशने आता मेघाबरोबरच्या भांडणावर मौन सोडलं आहे. ‘न्यूज १८ लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत योगेश जाधवने याबद्दल भाष्य केले.

मेघा घाडगे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिने योगेशवर अनेक आरोप केले होते. मेघानं योगेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र त्यानंतर योगेशने मेघा घाडगेचे सर्व आरोप फेटाळले आहेत. “मी असं काहीही बोललेलो नाही. हा एक मोठा गैरसमज होता. मेघा ताईंना माझे काही शब्द समजले नाहीत. ते तिनं वाईट अर्थाने घेतले. ती माझी मोठी बहिण असल्यामुळे मी असं काही बोलू शकत नाही”, असे योगेश जाधव म्हणाला.

बिग बॉसच्या घरात तुझ्यात आणि वाद मिटवण्यासाठी काय करणार? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर योगेश जाधव म्हणाला, “मी एक दोन दिवसात तिला भेटेल. मी एलिमिनेशच्या वेळी ताईला तू पाया चांगला बनवते, मी पाया खायला नक्कीच येईन. त्यावेळी ती म्हणाली तू नक्की ये.”

“पण जर तिला काही गोष्टी खटकल्या असतील तर पुढे एक दोन दिवसात जाऊन तिची समजूत घालेन. पण एक लहान भाऊ म्हणून मी नक्कीच तिची समजून काढेन”, असे योगेश जाधव म्हणाला.

दरम्यान बिग बॉसच्या घरातील विकास आणि योगेश डेंजर झोनमध्ये होते. त्यातून योगेश जाधवला बिग बॉसचे घर सोडावे लागले. बिग बॉसने त्याच्या नावाची घोषणा केल्यानंतर तो भावूक झाला. तसेच घरातील अनेक सदस्यही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महेश मांजरेकरांनी त्याच्या खेळात कुठे चुकले, तो कुठे बरोबर होता, याबद्दल त्याला सांगितले.