‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, पहिल्या दिवसापासूनच हे पर्व गाजताना दिसत आहे. बिग बॉसच्या या पर्वात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले असून, अभिनय क्षेत्रातील कलाकारांबरोबरच यूट्यूबवरील प्रसिद्ध चेहरेदेखील दिसत आहेत. निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामधील भांडण हा विषय फक्त बिग बॉसच्या घरापर्यंत मर्यादित न राहता, त्याची चर्चा बाहेरदेखील होऊ लागली आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याशी वाद घातल्याने निक्की तांबोळीवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. एकीकडे भांडण सुरू असतानाच एका स्पर्धकाने मात्र प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. इरिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रेक्षक तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

एका व्हिडीओमध्ये इरिना आणि आर्या एकमेकींबरोबर बोलताना दिसत आहेत. त्यावेळी इरिना आर्याला विचारते की, तुला एकादशी माहीत आहे का? सुरुवातीला आर्याला इरिनाच्या उच्चारामुळे समजत नाही, की ती काय म्हणत आहे. त्यानंतर एकादशीचा उपवास, असे म्हटल्यानंतर आर्याच्या लक्षात येते. इरिना आर्याला सांगते की, ती ११ दिवस एकादशीचा उपवास करते. हे ऐकल्यानंतर आर्याला तिचे कौतुक वाटते आणि ती कॅमेऱ्यासमोर येऊन म्हणते की, बघा बिग बॉस ही इकडची नसूनही ११ दिवस एकादशीचा उपवास करते. इरिना यावेळी बिग बॉसकडे, मला एकादशी कधी आहे कळवा. कारण- माझ्याकडे कॅलेंडर नाही, असे म्हणताना दिसत आहे.

काय म्हणाले नेटकरी?

‘बिग बॉस मराठी ५’मधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, नेटकरी इरिनाचे कौतुक करताना दिसत आहेत. भारतीय नसूनही तिने इथल्या संस्कृतीशी स्वत:ला जोडून घेतल्याचे अनेकांनी म्हटले आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “जी या देशाची नाही; पण या मातीची झाली”, “इरिनाने मन जिंकले”, “आपण तिच्याकडून शिकले पाहिजे”, “खूप छान”, अशा कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.

इरिना ही मॉडेल व अभिनेत्री असून आयपीएलमध्ये ती चीअर लीडर म्हणून सहभागी झाली होती. तेव्हापासून ती मोठ्या चर्चेत आहे. कलर्स टीव्हीच्या ‘छोटी सरदारनी’ मालिकेत तिने भूमिका निभावली होती. आता बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होत, तिने प्रेक्षकांना धक्का दिला आहे. कारण- मराठी बिग बॉसमध्ये सहभागी होणारी इरिना ही पहिलीच भारतीय नसलेली स्पर्धक आहे. इरिनाचे मराठी उच्चार स्पष्ट नसले तरी तिचे बोलणे वा ऐकणे आता प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा विषय झाल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: आमिर खानला आलेले मुलाचे टेन्शन! म्हणाला, ‘जुनैदच्या बॉलीवूड पदार्पणावेळी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांचे भांडण कोणते वळण घेणार आणि आठवड्याच्या शेवटी रितेश देशमुख कोणाची शाळा घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याआधीच्या चार पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. पहिल्यांदाच रितेश देशमुख बिग बॉसचे सूत्रसंचालन करीत असल्याने या नवीन भूमिकेत तो प्रेक्षकांचे मन जिंकणार का? हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.