Ankita Walawalkar Support To Pranit More : ‘बिग बॉस १९’ शो सुरू होऊन आता जवळपास महिना व्हायला आला आहे. शो सुरू झाल्यानंतर आता हळूहळू रंगत यायला लागली आहे. टास्कसाठी भांडण, वादविवाद होताना दिसत आहे. अशातच नुकत्याच झालेल्या एका भागात बसीर अली आणि प्रणित मोरे यांच्यात चांगलाच वाद झाला.
गायक अमाल मलिक आणि प्रणित मोरे यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीत बसीरने हस्तक्षेप केला आणि यानंतर प्रणीत आणि बसीरमध्ये वाद सुरू झाला आणि हा वाद खूप टोकाला गेला.
अमाल आणि प्रणितच्या भांडणात बसीर मुद्दाम आला आणि तो प्रणितशी वाद घालू लागला. त्यात अनेकदा त्याने च्या शरीराला स्पर्श करत नियमांचे उल्लंघनसुद्धा केले. या भांडणाचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत आणि या व्हिडिओखालील कमेंट्स मध्ये अनेक जण प्रणीतच्या बाजूने बोलत आहेत.
अशातच आता ‘बिग बॉस मराठी ५’ मधील स्पर्धक अंकिता वालावलकरनेसुध्दा या वादावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसंच या व्हिडीओद्वारे तिने प्रणितला पाठिंबाही दिला आहे.
अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये बसीर प्रणितला “Go Back To Your Village” असं म्हणत चिडवलं होतं. त्याच्या याच वक्तव्याबद्दल अंकिता असं म्हणते, “दुसऱ्याला Go Back To Your Village म्हणत आहे, जसा हा मोठा शहरातूनच आलाय… गावाकडून आलोय असं म्हणत आहेस. पण तेच गावचे लोक वोट आणि तुझ्यासाठी कपडेही पाठवून देतील. हीच ती वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी लोकांनी आणि गावखेड्यातल्या प्रत्येकाने प्रणितला वोट करा. आता आम्हाला बघायचंच आहे की, कोण गावाला जातंय.”
यापुढे अंकिता सर्वांना “प्रणित ‘बिग बॉस’मधून बाहेर येता कामा नये. त्यामुळे सगळ्यांनी त्याला भरभरून वोट करा” असं सांगते. यानंतर व्हिडीओमध्ये “प्रणित मी उगाच कोणत्याही गोष्टीवरून भांडत नाही. मला कोणत्याही गोष्टीवरून भांडण करून प्रसिद्ध व्हायचं नाही असं” म्हणतो.
अंकिता वालावलकर इन्स्टाग्राम व्हिडीओ
यावर अंकिता तिचं मत व्यक्त करीत म्हणते, “बिग बॉस हे घर असंच आहे. घरात असताना काय वाटतं, हे मला माहीत आहे. त्यामुळे प्रणितची अवस्था अगदी माझ्यासारखीच आहे. उगाच मुद्दे बनवा, त्यावरून भांडण करा. टिव्हीवर सतत दिसण्यासाठी काहीतरी करणाऱ्यातला प्रणीत नाही. त्यामुळे आपल्या भावाला सपोर्ट करा. त्याला खूप खूप वोट द्या.”
यापुढे अंकिता तिचा नवरा कुणाल भगतला जाऊन विचारते. कुणाला वोट करायचं? त्यावर कुणालसुद्धा तिला उत्तर देत म्हणतो, “अगं हा काय प्रश्न आहे का? प्रणितलाच वोट करायचं.” दरम्यान, अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांनीसुद्धा प्रणितला पाठिंबा दिला आहे.