‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. यंदाच्या पर्वात मराठमोळा अभिनेता किरण मानेही सहभागी झाले होते. मानेंनी तल्लख बुद्धी व उत्तम खेळाच्या जोरावर प्रेक्षकांना व इतर स्पर्धकांनाही त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या टॉप ३ सदस्यांपैकी माने एक होते. परंतु, त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ‘बिग बॉस’नंतर त्यांच्या लोकप्रियतेतही प्रचंड वाढ झाली आहे. माने त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती देत असतात. अनेक किस्सेही किरण माने पोस्टमधून चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. परफेक्ट मिसमॅच नाटकादरम्यानचा असाच एक किस्सा किरण मानेंनी शेअर केला आहे.

हेही वाचा>> अजय देवगणच्या ‘भोला’वर ‘हा’ दाक्षिणात्य चित्रपट पडणार भारी, पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘परफेक्ट मिसमॅच’ नाटकादरम्यानचे काही फोटो शेअर करत हा किस्सा सांगितला आहे. किरण माने व अमृता सुभाष मुख्य भूमिकेत असलेल्या या नाटकाच्या प्रयोगादरम्यान एक उंदीर स्टेजवर आला होता. त्यानंतर नेमकं काय घडलं होतं ते किरण मानेंच्या पोस्टमधून जाणून घेऊया.

…बेकार फजिती झाली असती राव त्यावेळी. ‘परफेक्ट मिसमॅच’ नाटकाचा ठाण्यात गडकरीला प्रयोग होता. धुलीवंदनाची सुट्टी होती. जवळजवळ फुल्ल भरलेले थिएटर…प्रयोगही छान रंगू लागला. नाटकात मी ‘जयंत’ आणि अमृता ‘प्राची’! जयंत गावाकडचा साताऱ्याजवळचा रांगडा धसमुसळा गडी. जुन्या बिल्डींग्ज पाडणारा ब्रेकींग कॉन्ट्रॅक्टर आणि प्राची पुण्यातली हायफाय डिसेन्ट मुलगी. ‘परफेक्ट मिसमॅच’ !

अमृता रात्रीच्या निवांत वेळी ‘चांदणं पहायला’ टेरेसवर येते. तिच्या लक्षात येतं टेरेसला लागून असलेल्या स्टोअररूममध्ये मी कुमार गंधर्वांचा नंद राग ऐकत स्कॉच पित बसलोय…माझी रांगडी-गावठी पर्सनॅलिटी आणि कुमारजी-स्कॉच हे विचित्र कॉम्बिनेशन पाहून ती चकीत होते…गप्पा मारायला बसते. बोलता-बोलता पेग भरून घेते. आणि गप्पा रंगत जातात. पेगवर पेग रिचवले जातात. दोघेही फुल्ल टल्ली होतो. असा सीन मस्त रंगात आला. हशा-टाळ्या सुरू होत्या.

एका क्षणी प्रेक्षकांतून वेगळीच कुजबूज ऐकू येऊ लागली. काही स्त्रियांच्या ‘ईईS’ अशा बारीक किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. सीनमध्ये जे सुरू होते, त्याला हा अगदीच ‘ऑड’ रिस्पॉन्स होता. आम्ही दोघेही किंचीत कॉन्शस झालो. पण बेअरिंग सोडले नाही. प्रतीक्षिप्त क्रियेने आमचे कपडे ठिकठाक आहेत का हे आधी चेक केले! हुश्श!! ठीक होते. मग काय झालंय???

प्रेक्षकांतले आवाज वाढू लागले. मी त्याच बेअरींगमध्ये इकडे तिकडे पाहीले…तर एक भला मोठ्ठाच्या मोठ्ठा उंदीर स्टेजवर आला होता. आणि त्याची नजर आमच्या सीनमध्ये ठेवलेल्या ‘चखण्या’वर होती…हळूहळू तो त्या दिशेने येत होता.

अमृताची त्या उंदराकडे पाठ होती. तिने बेअरींग न सोडता नजरेनेच मला ‘काय झाले?’ असे विचारले. मी त्याच टल्ली अवस्थेत उंदराला म्हणालो, “ये ये भावा..तुझीच कमी होती. खा चखना…” अमृताही बेअरिंग न सोडत क्षणार्धात म्हणाली, “अरे आपल्याला कंपनी द्यायला हासुद्धा आला.” प्रेक्षकातून बंपर लाफ्टर आला. उंदराने बिचार्‍याने घाबरून विंगेत एक्झीट घेतली. मी परत अमृताकडे वळत “धुलवड साजरी करायला आला आसल” असं म्हणत सीन पुन्हा सुरू केला. सीनही ‘लाईट’ मूडचा असल्यामुळे वेळ निभावून गेली आणि पुढे नाटक भन्नाट पार पडले.. पण त्यावेळी अमृता आणि मी दोघांच्याही पोटात गोळा आला होता हे मात्र खरे…”वाईट फजिती होऊन अख्ख्या प्रयोगाची वाट लागली असती तर” या जाणीवेनं अजून अंगावर काटा येतो!!

किरण मानेंनी नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा हा भन्नाट किस्सा शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame kiran mane shared incidence when rat come on stage during drama play kak