Utkarsh Shinde comment on Suraj Chavan New Home : लोकप्रिय रीलस्टार, ‘बिग बॉस मराठी’ ५ चा विजेता आणि ‘झापुक झुपूक’ फेम सूरज चव्हाणच्या नवीन घराचं बांधकाम पूर्ण झालंय. सूरज चव्हाणने बहिणींबरोबर नवीन घरात गृहप्रवेश केला आणि पूजा केली. लग्नाआधीच सूरज नवीन घरात राहायला गेला आहे. सूरजच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर गायक उत्कर्ष शिंदेने केलेल्या कमेंटने लक्ष वेधलं आहे.
सूरज चव्हाणला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घर बांधून दिलं. सूरज चव्हाण हा बारामती तालुक्यातील मोढवे गावचा आहे. याच गावात सूरजचं आलिशान घर उभं राहिलंय. सूरजने गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केल्यावर चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत. मराठी गायक व ‘बिग बॉस मराठी’ फेम उत्कर्ष शिंदेनेही एक खास कमेंट करून सूरजचं अभिनंदन केलं आहे.
“काही हसले, काहींनी टीका केली, काहींनी लुबाडलं, काहींनी अपात्र ठरवलं, काहींनी अडवलं, पण तू कधीच थांबला नाहीस. अंती तू फिनिक्स पक्ष्यासारखं पुन्हा जग जिंकायला तयार झालास. आणि जसं नावं तसंच उजळून निघालास सूरज बस नाम ही काफी है. शिंदेशाहीसलाम तुझ्या जिगरबाज पणाला,” अशी कमेंट उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाणच्या व्हिडीओवर केली आहे.
उत्कर्ष शिंदेची कमेंट

सूरजला हक्काचं घर मिळालंय, तसेच तो लवकरच लग्नही करतोय. हे सगळं पाहून चाहतेही भारावले आहेत. ‘सूरज, नवीन घरासाठी आणि भावी आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा!,’ ‘तुझ्याबद्दल कितीही काही बोलले, तरी तू कधीच निराश झाला नाहीस, हीच तुझी खरी ताकद होती! त्या प्रत्येक शब्दाला तू आपल्या कामातून उत्तर दिले. आज, तुझ्या डोळ्यातील स्वप्न या सुंदर बंगल्याच्या रूपात साकार झाले आहे. तुझे यश पाहून, टीका करणाऱ्यांनाही आज तुझ्या धैर्याचे कौतुक करावे लागेल. अभिनंदन,’ ‘आमदारांच्या घरासमोर पन फिकं पडणार गरीबाचं घर,’ ‘चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगुन जातो…. अभिनंदन’, ‘यशासाठी अनेक रात्री जागून त्याचा पाठपुरावा करावा लागतो,’ अशा कमेंट्स चाहत्यांनी सूरज चव्हाणच्या पोस्टवर केल्या आहेत.
दरम्यान, सूरज चव्हाण लवकरच लग्न करतोय. १० दिवसांनी त्याचं संजनाबरोबर लग्न आहे. सूरज व संजना यांचं लव्ह मॅरेज आहे. सूरज चव्हाण व संजना २९ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. २८ नोव्हेंबरपासून त्याच्या लग्नविधींना सुरुवात होईल. जेजुरीजवळील सासवड याठिकाणी हा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नापूर्वी सूरजने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.
