Dhananjay Powar & Jahnavi Killekar : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन तुफान गाजला. या शोमुळे बऱ्याच स्पर्धकांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. कोल्हापूरचा धनंजय पोवार आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर या दोघांनीही महाअंतिम फेरीपर्यंत बाजी मारली होती. मात्र, ‘बिग बॉस’च्या झगमगत्या ट्रॉफीवर गेल्यावर्षी सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं होतं. अर्थात सूरजच्या विजयानंतर शोमधील प्रत्येकाने आनंद व्यक्त केला होता.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला आता जवळपास एक वर्ष पूर्ण होणार आहे. मात्र, आजही या शोमध्ये सहभागी झालेल्या अनेक स्पर्धकांचं एकमेकांशी असलेलं बॉण्डिंग तेवढंच घट्ट आहे. नुकतीच अभिनेत्री जान्हवी किल्लेकर कोल्हापूरला गेली होती. यावेळी तिने धनंजय पोवारच्या दुकानाला म्हणजेच ‘सोसायटी फर्निचर’ला भेट दिल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ धनंजयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जान्हवी शोमध्ये धनंजयला ‘डीपी दादा’ म्हणायची. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला या दोघांमध्ये प्रचंड खटके उडायचे. पण, त्यानंतर जान्हवीने गेम खेळण्याच्या पद्धतीत बदल केल्याने या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. यामुळे जान्हवीने कोल्हापूरला गेल्यावर आवर्जून धनंजय व त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
‘सोसायटी फर्निचर’मध्ये पोहोचल्यावर जान्हवीने सर्वप्रथम डीपीच्या आई-बाबांचे पाया पडून आशीर्वाद घेतले. यानंतर त्यांच्या मुलीची भेट घेतली. धनंजयच्या पत्नीने यावेळी जान्हवीला त्यांच्या ब्रँडची साडी देखील गिफ्ट दिली. अभिनेत्री व पोवार कुटुंबीय या व्हिडीओमध्ये दिलखुलास गप्पा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे.
धनंजय आणि जान्हवीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “याला म्हणतात खरी मैत्री…”, “आपल्या कोल्हापूरचा वाघ आणि आपली माणसं”, “वहिनींनी साडी दिली जान्हवीला हीच खरी आपली परंपरा आहे” अशा प्रतिक्रिया व्हिडीओवर युजर्सनी केल्या आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’ नंतर धनंजय पोवार सध्या ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात झळकत आहे, याचबरोबर आपला व्यवसाय देखील सांभाळत आहे. तर, जान्हवी किल्लेकर ‘स्टार प्रवाह’च्या ‘अबोली’ मालिकेत झळकली होती.