Bollywood Actress on Bigg Boss : छोट्या पडद्यावरील कायमच चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. मराठीसह हिंदीमध्ये हा शो प्रेक्षक पाहतात. त्यामुळे या शोचे असंख्य चाहते आहेत. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वासाठी चाहते मंडळी वाट पाहत असतात. अशातच लवकरच ‘बिग बॉस १९’ सुरू होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘बिग बॉस १९’ची चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस १९’ हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या शोमध्ये टीव्ही आणि बॉलीवूड विश्वातील कोणते कलाकार सहभागी होणार या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ‘बिग बॉस’च्या आगामी पर्वात सहभागी होणाऱ्या अनेक कलाकारांच्या नावांच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री मल्लिका शेरावत.
‘बिग बॉस १९’मध्ये सहभागी होण्याच्या यादीत मल्लिका शेरावतचं नाव असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होताना दिसत आहे. मात्र, आज (२८ जुलै) रोजी मल्लिकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री नेमकं काय म्हणाली? चला जाणून घेऊ…
‘बिग बॉस १९’मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांवर उत्तर देत मल्लिकाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे आणि या स्टोरीमध्ये ती असं म्हणते, “या सर्व अफवांना आता पूर्णविराम! मी ‘बिग बॉस’ शो करत नाहीय आणि यापुढेही कधीच करणार नाही. धन्यवाद.”

मल्लिकापूर्वी, अभिनेत्री डेजी शहा, अभिनेते राम कपूर आणि गौरव तनेजा हेही ‘बिग बॉस १९’मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र याबद्दल त्यांनी स्वत: प्रतिक्रिया व्यक्त करत शोमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस १९’मध्ये कोणते कलाकार दिसणार, याबद्दलचे अनेक वृत्त समोर येत आहेत. या वृत्तांमधून नील मोटवानी, अर्हान अन्सारी, शशांक व्यास, खुशी दुबे, शरद मल्होत्रा, मून बॅनर्जी आणि लता सबरवाल या नावांचा समावेश आहे. पण अद्याप याबद्दल कोणतीच ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे बिग बॉस १९ मध्ये नक्की कोण कोण सहभागी होणार? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान, मल्लिका शेरावतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटची २०२४ मध्ये आलेल्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटात तिची मुख्य भूमिका नव्हती, तरी तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.