Bhau Kadam : ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेलं लोकप्रिय नाव म्हणजेच भाऊ कदम. आजवर अनेक चित्रपट, कॉमेडी शोजमध्ये काम करून भाऊ कदम यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या सीझनमध्ये सुद्धा प्रेक्षक प्रामुख्याने भाऊ कदम यांना मिस करतात.

भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये साकारलेलं ‘शांताबाई’ पात्र सर्वत्र तुफान लोकप्रिय झालं होतं. त्यांनी नुकतीच ‘मुक्कामपोस्ट मनोरंजन’च्या पॉडकास्टमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी दिलखुलास गप्पा मारत ‘चला हवा येऊ द्या’ शोबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या.

“ज्यावेळी तुम्ही स्त्री पात्र करत होता, तेव्हा तुमच्या डोक्यात नेमके काय विचार होते?” या प्रश्नावर भाऊ कदम म्हणाले, “याची सुरुवात निलेश साबळेमुळे झाली. त्याने मला सांगितलं की, तुला असं-असं पात्र करावं लागेल. तो म्हणाला, ‘बाई व्हायचंय’ यावर मी त्याला बोललो, ‘अरे मला माहितीये मी कसा दिसेन, तू काय म्हणून हा विचार केलास”

“पण, निलेश खूप ठाम होता. तू कर… मी सांगतो म्हणून कर! आपण छान मेकअप करुयात. तेव्हा मी त्याच्यासाठी हे पात्र करण्याचा निर्णय घेतला. कारण, त्याला माझ्यात ती शांताबाई दिसली होती. ते पात्र आमच्याकडून खूप छान साकारलं गेलं. अजिबात विक्षिप्तपणा नव्हता…काम खूप छान झालं आणि ते पात्र लोकांना आवडलं. लोकांना ती भूमिका एवढी आवडली की, कार्यक्रमाला जिथे जायचो तिथे लोक शांताबाई म्हणून ओळखू लागले. विशेषत: महिलावर्ग या भूमिकेवर खूपच प्रेम करतात.” असं भाऊ कदम यांनी सांगितलं.

बायकोची प्रतिक्रिया काय होती?

भाऊ कदम सांगतात, “शांताबाई करताना खूप भीती असायची की, चुकूनही आपल्याकडून काहीतरी वेगळं जायला नको. पण, निलेश साबळे भूमिका लिहिताना या सगळ्या गोष्टींची खूप काळजी घ्यायचा. तो जेवढं लिहायचा, तेवढंच मी करायचो. अतिउत्साहीपणा मी कधीच त्या स्किटमध्ये दाखवला नाही. अर्थात शांताबाई करताना पहिल्यांदा खूप घाबरलो होतो. पहिल्यांदा या रुपात तयार झाल्यावर मी माझ्या बायकोला सुद्धा फोटो पाठवला होता. ती म्हणाली, ‘छान दिसताय’ आता तिच्याकडून चांगली प्रतिक्रिया मिळाल्यावर मी एकदम निर्धास्त झालो.”