Bhau Kadam Shares Fan Story : ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधून आपल्या निरागस हास्याने सर्वांचे मनोरंजन करणारे विनोदी अभिनेता म्हणून भाऊ कदम यांची लोकप्रियता सर्वश्रुत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोने त्यांना अमाप प्रसिद्धी आणि लोकप्रियता दिली. या शोमध्ये भाऊ कदम यांनी नानाविध भूमिका साकारल्या. शोमधील त्यांच्या भूमिका व विनोदी अभिनय आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत.

भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’शिवाय ‘टाइमपास’, ‘हाफ तिकीट’, ‘नशीबवान’, ‘सायकल’, ‘घे डबल’, ‘व्हीआयपी गाढव’, ‘पांडू’ अशा अनेक चित्रपटांतही काम केले आहे; त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रभरात त्यांचा चाहतावर्ग आहे. अशातच भाऊ कदम यांनी त्यांच्या एका चाहतीचा किस्सा सांगितला आहे. या चाहतीने देवाच्या बाजूला चक्क भाऊ कदम यांचा फोटो लावला आहे.

भाऊ कदम यांनी नुकतीच ‘मुक्कामपोस्ट मनोरंजन’ या पॉडकास्टच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी भाऊ कदम त्यांच्या चाहत्यांच्या आठवणी सांगत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या एका चाहतीचा अनोखा किस्सा सांगितला.

यावेळी भाऊ कदम यांनी सांगितलं की, “एक मोलमजुरीचं काम करणारी बाई होती. तिला ‘चला हवा येऊ द्या’ खूप आवडायचे. ती माझी खूप मोठी फॅन. तर तिला ‘चला हवा येऊ द्या’ शो बघायचा असायचा; पण तिच्याकडे टीव्ही नसल्याने ती बाजूवाल्यांकडे जायची. पण, ते शेजारी दरवाजा बंद करून घ्यायचे, नाही आता नाही… बस्स झालं, नंतर या असं म्हणायचे. तर तिने कष्ट करून, पैसे जमवून टीव्ही घेतला. देवाच्या बाजूला माझा फोटो लावला आणि काम करायला जाताना ती पाया पडून जायची. ही गोष्ट मला माझ्या एका मित्राने सांगितली.”

यापुढे भाऊ कदम सांगतात, “मित्राने या बाईबद्दल मला सांगताच, मी म्हटलं तिच्याशी संपर्क साधा. मग शोचा हजारावा एपिसोड करायचा होता तेव्हा तिला आणलं. त्यावेळी चॅनेलकडून तिला साडीचोळी देण्यात आली होती. त्या बाईने तिच्या मुलीला अभिनयच्या शाळेत टाकलं आहे, कारण तिला कधीतरी भाऊ कदम भेटतील. आता ती मुलगी शिकत आहे. इतकं लोक प्रेम करतात आणि हे ‘चला हवा येऊ द्या’ शोने दिलं आहे. पूर्ण आयुष्यात एवढं कधी कुणाला मिळत नाही, पण आम्हाला दहा-अकरा वर्षांत हे इतकं काही मिळालं आहे.”

भाऊ कदम इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, भाऊ कदम यांचा ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा आला असून यात भाऊ कदम यांच्यासह मनोज बाजपेयी, सचिन खेडेकर, गिरिजा ओक, ओंकार राऊत, हरीश दुधाडे आणि वैभव मांगले असे दमदार कलाकारही आहेत.