Kushal Badrike Navratri Video : शारदीय नवरात्रोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली असून सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नवरात्रीनिमित्त स्त्रिया नऊ रंगाच्या ड्रेस आणि साड्या परिधान करताना दिसतात. अनेक अभिनेत्री या नऊ रंगांच्या विविध लूकमधील फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसतात.
अशातच आज (२२ सप्टेंबर) पांढरा (सफेद) रंग आहे. अनेक अभिनेत्री पांढऱ्या रंगातील साडी आणि ड्रेसमधील फोटो आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर करत आहेत. अशातच अभिनेता कुशल बद्रिकेनेही नवरात्रीमधील नऊ रंगांबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोद्वारे प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेला कुशल सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो.
सोशल मीडियाद्वारे तो आपले अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसतो. या पोस्टखालील त्याचे कॅप्शन्स अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. अशातच कुशलने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
या व्हिडीओमध्ये कुशल म्हणतो, “नऊ रंग आणि नवरात्री यांचा विचार करत असताना मला अचानक ज्या गोष्टींचा साक्षात्कार झाला ना… त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. रंग बदलणारी माणसं या जगात आहेत, पण त्या रंगांचा उपयोग नवरात्रीत होत नाही. तसंच रंग बदलणारा सरडासुद्धा असतो, पण त्यालाही नवरात्र साजरी करता येत नाही.”
यानंतर कुशल असं म्हणतो, “होळीत आपण आपल्या अंगाला वेगवेगळे रंग लावतो, तर नवरात्रीत आपण कपड्यांच्या वेगवेगळ्या रंगांना आपलं अंग लावतो. ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ या सुरेश भटांच्या गाण्यात ज्या रंगाविषयी बोललं जातंय, तो रंग दाखवण्याचा नसून वैयक्तिक अनुभवण्याचा आहे; त्यामुळे नवरात्रीत त्या रंगांचा उपयोग होत नाही आणि कदाचित म्हणूनच हे गाणं गरब्यात वाजत नाही.”
व्हिडीओमध्ये पुढे कुशलने म्हटलंय, “युपीत सुरू झालेली कृष्णाची रासलीला गुजरातमध्ये मानल्या जाणाऱ्या संतोषी मातेपुढे खेळली जाते आणि महाराष्ट्रात हा उत्सव जोरदार साजरा केला जातो, त्यामुळे या उत्सवाला जाती-पातीचा रंग चढत नाही आणि माणूस म्हणून जगण्याची रंगत येते, हे या सणाचं मला वैशिष्ट्य वाटतं.” पुढे कुशलने नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कुशलने शेअर केलेला हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस उतरला आहे, अशा प्रतिक्रियासुद्धा अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
कुशल बद्रिके इन्स्टाग्राम व्हिडीओ
दरम्यान, कुशल ‘चला हवा येऊ द्या’ या शोसह काही सिनेमांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या तो ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्याच दुसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या शोमध्ये कुशलसह श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव हेही आहेत; तर अभिनेता अभिजीत खांडकेकर या शोचं सूत्रसंचालन करत आहे.