Priyadarshan Jadhav on friends: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मैत्रीचे स्थान महत्त्वाचे असते. कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जवळच्या मित्रांची गरज लागते. आयुष्याच्या संकट काळात, निराश झालेल्या मनस्थितीत, हार मानलेली असताना चांगले मित्र पाठिंबा देतात. ते कधीही त्यांच्या जवळच्या मित्राला हार मानू देत नाहीत.

“माझे मित्र माझ्या मागे…”

आता अभिनेता प्रियदर्शन जाधवनेदेखील मित्रांचे त्याच्या आयुष्यातील महत्त्व सांगितले आहे. झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यानच्या व्हायफळ पॉडकास्ट सेशनमध्ये त्याला विचारण्यात आले की, आयुष्यामध्ये स्वप्न बघणं खूप महत्त्वाचं असतं, त्यासाठी कुठूनतरी ऊर्जा मिळत असते. लोकांकडून, घरातील मंडळींकडून, मित्र-मैत्रिणींकडून ऊर्जा मिळत असते. मोठी स्वप्नं बघण्यासाठी तुम्हाला कोणाकडून ऊर्जा मिळते.

त्यावर प्रियदर्शन म्हणाला, “घरचे आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळींकडून ऊर्जा मिळते. घरचे कायमच आपल्याला पाठिंबा देत असतात. चांगल्या वाईट परिस्थितीत आपणही त्यांना पाठिंबा देतो आणि तेदेखील आपल्याला पाठिंबा देतात.”

“मित्रांचं थोडं वेगळं असतं, कारण त्यांना पूर्ण माहिती असतं की घरातून बाहेर पडल्यानंतर काय खाचखळगे आहेत आणि ते कायम आपल्याबरोबर असतात; त्यामुळे आपल्या अडचणींबाबत त्यांना कल्पना असते. मला कधी निराश वाटत असेल किंवा आपल्याला अमुक या चार गोष्टी पूर्ण करायच्या आहेत, तर त्या बहुतांशी गोष्टी मित्रांमुळे पूर्ण होतात. ते मला सतत पाठिंबा देतात.”

“या गोष्टी फार महत्त्वाच्या…”

पुढे एक आठवण सांगत अभिनेता म्हणाला, “मी सिनेमा लिहायला घेतला होता. तो मी अर्धवट सोडला होता. त्यानंतर माझे मित्र माझ्या मागे लागले होते की असं करू नकोस. हा चांगला सिनेमा आहे. अक्षरश: त्यांनी माझ्याकडून तो सिनेमा लिहून घेतला. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचायला आपल्यापेक्षा आपले मित्र किंवा आपल्या पाठीशी असलेली माणसं अधिक कारणीभूत असतात, असं मला वाटतं.”

प्रियदर्शनच्या कामाबद्दल बोलायचे तर सध्या तो झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात काम करताना दिसत आहे. विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवत तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तसेच तो लेखनाचीदेखील जबाबदारी सांभाळत असल्याचे दिसत आहे.

प्रियदर्शनने काही चित्रपटांतदेखील काम केले आहे. तो नाटकांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतो. आता अभिनेता आगामी काळात कोणत्या चित्रपटात दिसणार, कोणत्या भूमिकेत तो प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, झी मराठी पुरस्कार सोहळा ११ आणि १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. आता या पुरस्कार सोहळ्यात कोणत्या मालिकेला कोणता पुरस्कार मिळणार, कोणत्या कलाकारांना कोणता पुरस्कार मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.