Sagar Karande on playing female character: अनेक पुरुष कलाकार स्त्री व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये, चित्रपटांमध्ये हे पाहायला मिळते. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर आणि दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखांचे आजही कौतुक होताना दिसते. वैभव मांगले, सुबोध भावे यांनी साकारलेल्या स्त्री पात्रांचेदेखील मोठे कौतुक झाले.
सागर कारंडे काय म्हणाला?
याबरोबरच भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि सागर कारंडे यांनीदेखील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात अनेकदा स्त्री पात्रे साकारली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.
आता अभिनेता सागर कारंडेने स्त्री व्यक्तिरेखा साकारताना काय काळजी घेतली पाहिजे यावर त्याचे मत मांडले आहे. त्याने सोशल मीडियावर दिलेल्या मुलाखतीवर आधारित आलेल्या एका लेखाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने स्त्री व्यक्तिरेखेबद्दल मत मांडले आहे.
महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सागर कारंडे स्त्री व्यक्तिरेखांबद्दल म्हणाला, “पुरुष कलाकारानं स्त्री व्यक्तिरेखा साकारताना कोणत्याही प्रकारे त्यांचा अपमान होणार नाही, हे डोक्यात आणि मनात फिट बसवलं पाहिजे. कसंही नाचणं, उड्या मारणं, वाकडेतिकडे हातवारे करणं, विचित्र हावभाव करणं म्हणजे स्त्री व्यक्तिरेखा साकारणं असं नसतं.”
पुढे तो म्हणाला, “ती व्यक्तिरेखा साकारताना त्या कलाकाराला भारी वाटलं पाहिजे, साडी सांभाळणं हे माझ्यासमोर मोठं आव्हान होतं, साडी नेसल्यावर नीटनेटकं वावरणं आवश्यक असतं. कुठे पदर सरकला आहे, पोट दिसतंय, हे होता कामा नये. दुसऱ्या बाईली ती व्यक्तिरेखा पाहताना छान वाटलं पाहिजे, हे माझं ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमासाठी ध्येय असायचं. वावरण्यात महिलांप्रमाणे सहजता यावी म्हणून मी आई आणि पत्नीचं निरीक्षण करायचो, कारण मी साकारलेली स्त्री माझी मुलगी पाहणार होती. तिच्यापर्यंत ते सन्मानपूर्वकच पोहोचलं पाहिजे, असा माझा विचार होता.”
दरम्यान, सध्या अभिनेता टही फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो.