Chala Hawa Yeu Dya Show Theme Change : प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘झी मराठी’चा कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ यंदा जुलै महिन्यात पुन्हा एकदा सुरू झाला. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘लय भारी’ सिनेमाच्या निमित्ताने २०१४ मध्ये झाली होती. यानंतर या शोमध्ये मराठीसह बॉलीवूड सिनेमातील अनेक सेलिब्रिटी प्रमोशननिमित्त सहभागी झाले होते. यावर्षी मात्र या शोचं संपूर्ण स्वरुप बदलण्यात आलं.
‘चला हवा येऊ द्या’ शोसाठी यंदा महाराष्ट्रभरातून ऑडिशन घेण्यात आल्या होत्या. यानंतर श्रेया बुगडे, गौरव मोरे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके आणि प्रियदर्शन जाधव या पाच गँगलीडर्सच्या टीम्स तयार करण्यात आल्या. यांच्यात कॉमेडीचं गँगवॉर रंगणार होतं. मात्र, अवघ्या दोन महिन्यात या शोची संकल्पना बदलण्यात आली आहे.
गँगवॉर ही थीम संपवून आता ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा मूळ स्वरुपात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा बदल येत्या २० सप्टेंबरपासून केला जाणार आहे. आधीच्या पर्वाप्रमाणे आता इथून पुढे दर आठवड्यात नवीन पाहुणे या शोमध्ये सहभागी होतील.
भारत गणेशपुरे याबद्दल सांगतो, “चला हवा येऊ द्या’ या मित्रमंडळाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, आपल्याला काहीतरी जबरदस्त करायचंय. प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सगळे पुन्हा एकदा कॉमेडीचं धुमशान करायला सज्ज आहोत. २० सप्टेंबरपासून राडा करणार… कॉमेडीचं पॅटर्न पुन्हा आणुयात.”
तर, होस्ट अभिजीत खांडकेकर म्हणतो, “ना परिक्षण, ना केली जाणार कोणावर कमेंट…आता फक्त होणार एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट…! पाच विनोदवीर त्यांच्या टीममधील सदस्यांसह स्वत: स्किट सादर करणार…आता पुन्हा नवीन पाहुणे येणार! मिशन कॉमेडी सुरू होणार” या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध कमेंट्स केल्या जात आहेत. “भाऊ कदमशिवाय मजाच नाही”, “भाऊ कदम आणि निलेश साबळेला परत आणा”, “भाऊ कदम पाहिजेच” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ हा शो येत्या २० सप्टेंबरपासून शनिवार आणि रविवार रात्री ९:३० वाजता प्रसारित केला जातो. या आठवड्यात शोमध्ये दिग्दर्शक संजय जाधव आणि रवी जाघव सहभागी होणार आहेत. यावेळी श्रेया बुगडे खास दुनियादारी सिनेमातील सई ताम्हणकरसारखा लूक करून स्किट सादर करणार आहे.