Chala Hawa Yeu Dya Show Time Changes : ‘चला हवा येऊ द्या’ हा शो जवळपास वर्षभराच्या ब्रेकनंतर २६ जुलैपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या आठवड्यात या शोमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मंचावर त्यांचं औक्षण करण्यात आलं होतं. यानंतर केक कापून सगळ्या कलाकारांनी सेलिब्रेशन केलं होतं. आता या पाठोपाठ मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर सन्मान करण्यात येणार आहे.
दिलीप प्रभावळकर म्हणजे मराठी कलाविश्वाचे ‘चौकट राजा’. त्यांनी साकारलेला ‘तात्या विंचू’ असो किंवा ‘पछाडलेला’ मधील ‘इनामदार’…दिलीप प्रभावळकरांच्या प्रत्येक भूमिकेने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘चुक भूल द्यावी घ्यावी’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ या त्यांच्या मालिकांमुळे प्रेक्षकांचा आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. आज वयाच्या ८१ व्या वर्षी सुद्धा ते त्याच एनर्जीने काम करत आहेत. लवकरच दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दशावतार’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच निमित्ताने ते ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये आले होते.
यावेळी ‘चला हवा येऊ द्या’चे गँगलीडर्स आणि स्पर्धकांनी मिळून दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान करण्यासाठी खास स्किट सादर केलं. त्यांचं औक्षण करण्यात आलं, यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘हे सगळं मी पहिल्यांदा अनुभवतोय’ असं सांगत दिलीप प्रभावळकर यांनी शोमधील सगळ्या कलाकारांना मोलाचं मार्गदर्शन केलं.
‘चला हवा येऊ द्या’च्या वेळेत बदल…
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या वेळेत अवघ्या महिन्याभरात बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला हा शो शनिवार-रविवार ९:०० वाजता प्रसारित होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. यानंतर आता शोची वेळ बदलण्यात आली आहे.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ हा शो आता नव्या वेळेत म्हणजेच ६ सप्टेंबरपासून रात्री ९:३० वाजता प्रसारित केला जाईल.