Colors Marathi : छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांची लोकप्रियता ही त्यांच्या टीआरपीवरून ठरवली जाते. ज्या मालिकांचा टीआरपी सर्वात जास्त त्या मालिका पाहणारा प्रेक्षकवर्ग सर्वाधिक असतो. अलीकडच्या काळात कमी टीआरपीचा फटका बसून अनेक मालिकांना लवकर आपला गाशा गुंडाळावा लागत आहे. आता येत्या काळात ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

‘अबीर गुलाल’ ही मालिका बंद होणार हे मालिकेचा मुख्य अभिनेता अक्षय केळकरच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झालं होतं. मात्र, अशातच वाहिनीवर नव्याने सुरू होणार्‍या ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेला ७.३० चा स्लॉट दिल्यामुळे नुकतीच सुरू झालेली ‘दुर्गा’ मालिका ऑफ एअर होण्याच्या चर्चा चालू झाल्या. काही दिवसांपासून ही मालिका संपणार की वेळ बदलणार याबाबत प्रेक्षक संभ्रमात होते. मात्र, आता मुख्य अभिनेत्रीने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. तसेच मराठी मालिकांबाबत अपडेट देणाऱ्या इन्स्टाग्राम पेजवर यासंदर्भातील वृत्त शेअर करण्यात आलं आहे.

हेही वाचा : Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधील तेजसने सोलापुरी भाषेत मानसीला केलं प्रपोज, म्हणाला, “बार्शी तिथं सरशी…”

रुमानी खरेची पोस्ट चर्चेत

‘दुर्गा’ मालिकेत अभिनेत्री रुमानी खरे प्रमुख भूमिका साकारत आहे. तिने नुकताच मेकअप रुममधील व्हिडीओ शेअर करत ‘One Last Time…Durga’ अशी पोस्ट शेअर केली आहे. रुमानी म्हणते, “खरंतर आता मनात सगळ्या भावना एकत्र दाटून आल्या आहेत. कारण, या खुर्चीवर बसून दुर्गाच्या भूमिकेसाठी मी शेवटची तयार होत आहे. हा प्रवास लहान होता पण, खूप काही शिकवून गेला. ज्यांनी ‘दुर्गा’च्या प्रवासात मदत केली, त्या सगळ्यांच्या कल्पना, मेहनत याची मी कायम ऋणी राहीन. पुन्हा भेटूयात…”

रुमानीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी “मालिका का एवढ्या लवकर संपतेय”, “लास्ट टाइम… मालिका का बंद होतेय” अशा कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय मराठी मालिकांच्या अपडेट देणाऱ्या इन्स्टाग्राम पेजवरून सुद्धा यासंदर्भातील वृत्त शेअर करण्यात आलं आहे.

Colors Marathi
Colors Marathi ( marathiserials_official )

हेही वाचा : Video: अर्जुनचं ‘ते’ कृत्य पाहून प्रियाला बसला धक्का आता…; पाहा ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Colors Marathi
नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Colors Marathi )

दरम्यान, ‘दुर्गा’ मालिका २६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर, येत्या आठवड्यात ‘दुर्गा’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मालिका अवघ्या तीन महिन्यांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. वाहिनीवरील ( Colors Marathi ) बहुतांश मालिका एवढ्या लवकर संपत असल्याने प्रेक्षकांनी सुद्धा याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.