कलर्स मराठीवरील ‘अशोक मा.मा.’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता या प्रवासात एक नवं वळण येणार आहे. भैरवीचा जुना मित्र ‘अर्जुन बेलवलकर’ तिचा बॉस म्हणून मालिकेत येणार आहे. अर्जुनच्या येण्याने या मालिकेचं समीकरण कसं बदलणार? मालिकेत कोणते ट्विस्ट येणार हे पाहुयात…
‘अशोक मा.मा.’ मालिकेत येणाऱ्या अर्जुनची भूमिका ‘कलर्स मराठी’वरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत साकारणार आहे. तर, भैरवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका वाखारकर सुद्धा यापूर्वी ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत सावीच्या भूमिकेत दिसली होती. त्यामुळे प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा अर्जुन-सावीची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. ‘अशोक मा.मा.’ मालिकेत या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.
‘अशोक मा.मा.’ मालिकेतील अर्जुन म्हणजेच इंद्रनील कामत याबद्दल म्हणाला, “पुन्हा एकदा ‘कलर्स मराठी’वर स्वतःला पाहताना खूपच आनंद होतो आहे. पहिली संधी मला याच वाहिनीने दिली होती आणि यावेळेस अजून एक सुवर्णसंधी देखील मला याच वाहिनीने दिली. यानिमित्ताने मला अशोक मामांबरोबर काम करायला मिळतंय. लहानपणापासून आपण त्यांचं काम बघतो आहे, त्यांना अनुभवतो आहे, मला खरंच असं कधीच वाटलं नव्हतं की, त्यांच्या बाजूला सुद्धा मला उभं राहता येईल, त्यांचं काम इतक्या जवळून पाहता येईल, त्यांच्याशी बोलता येईल. कारण, हे स्वप्नवत आहे.”
अभिनेता पुढे म्हणाला, “मी त्यांना आताही असंख्य प्रश्न देखील विचारतो आहे. कारण, ही संधी प्रत्येकालाच मिळते असं नाही. मला हिमालयाच्या सावलीत असल्यासारखं वाटत आहे. काम तर त्यांचं मोठचं आहे पण ते माणूस म्हणून देखील ग्रेट आहेत. या मालिकेद्वारे रसिकाबरोबर पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. आम्हाला सगळ्यांनाच शूटिंग करताना मजा येतेय आत तितकीच मजा प्रेक्षकांना देखील हे एपिसोड पाहताना येईल याची मला खात्री आहे.”
भैरवी आणि अर्जुन हे शाळेपासूनचे वर्गमित्र आतात. शाळेनंतर दोघांचा संपर्क तुटला होता, पण आता… अनेक वर्षांनी अर्जुन तिच्या ऑफिसमध्ये सीनियर म्हणून येतो आणि भैरवीच्या समोर उभा राहतो. भैरवी आणि अर्जुनमधील मोकळेपणा, जुन्या आठवणी… हे सगळं पाहून अनिशच्या मनात असुरक्षिततेचं वादळ निर्माण होतं. अर्जुनचा भूतकाळातील प्रेमभाव असला तरी तो आजच्या भैरवीच्या संसारात ढवळाढवळ करत नाहीये. अर्जुनचं आडनाव ‘बेलवलकर’ असल्याने अशोक मामा मालिकेत त्याला मस्करीत ‘आप्पासाहेब’ म्हणताना दिसणार आहेत. येणाऱ्या भागांमध्ये अशोक मामा आणि अर्जुनमध्ये छान मैत्री फुलताना दिसणार आहे.
दरम्यान, अशोक मामा आणि भैरवीचं नातं सुधारलं असतानाच अर्जुनची झालेली एन्ट्री…यामुळे नात्यांची समीकरणं बदलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘अशोक मा.मा.’ मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता पाहायला मिळते.