Colors Marathi Serial Off Air : छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीच्या आधारे ठरवली जाते. ज्या मालिकांना जास्त टीआरपी मिळतो, त्या वर्षानुवर्षे सुरू राहतात. तर, काही मालिका कमी टीआरपीमुळे अवघ्या ३ ते ४ महिन्यांमध्ये बंद झाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’, ‘दुर्गा’, ‘अंतरपाट’ अशा अनेक मालिकांनी टीआरपी अभावी अवघ्या काही महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील अशीच एक मालिका अवघ्या ७ महिन्यांमध्ये सर्वांचा निरोप घेणार आहे. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘लय आवडतेस तू मला’ ही मालिका वाहिनीवर सुरू झाली. ‘बिग बॉस मराठी’ संपल्यावर ही मालिका ऑन एअर झाली होती. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट, रांगडी प्रेमकथा अशी टॅगलाइन देत वाहिनीने या मालिकेचं प्रमोशन केलं होतं.

या मालिकेत तन्मय जक्का आणि सानिका मोजर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र, आता अवघ्या सात महिन्यांतच ही मालिका छोट्या पडद्यावरून एक्झिट घेणार आहे. मालिकेच्या मुख्य अभिनेत्याने स्वत: इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत याबाबतची अपडेट चाहत्यांना सांगितली आहे.

‘लय आवडतेस तू मला’ या मालिकेचा शेवटचा भाग रविवारी १८ मे रोजी प्रसारित केला जाणार आहे. अभिनेता तन्मय जक्काने यासंदर्भातील इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

“सानिका आणि सरकारच्या झन्नाट लव्हस्टोरीचा शेवटचा भाग नक्की बघा…” असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचे २०० भाग पूर्ण झाले होते. यावेळी सेटवर सगळ्या कलाकारांनी मिळून सेलिब्रेशन केलं होतं. पण, आता १८ मे रोजी या मालिकेचा निरोपाचा शेवटचा भाग प्रसारित केला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
colors marathi serial off air
‘कलर्स मराठी’वरील ‘लय आवडतेस तू मला’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्याची पोस्ट

दरम्यान, मालिका ऑफ एअर होत असल्याचं समजताच, प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये नाराजी व्यक्त केली आहे. “महाराष्ट्राच्या रांगड्या लव्ह स्टोरीचा शेवटचा अध्याय संपत आहे…वाईट वाटलं”, “सर्व कलाकारांना पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा”, “मालिका संपणार ही गोष्ट मनाला पटलेली नाही…” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.