‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘दार उघड बये’. १९ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेत अभिनेत्री सानिया चौधरी, रोशन विचारे, माया जाधव, शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी अंबिये, भाग्यश्री दळवी असे अनेक कलाकार पाहायला मिळाले होते. या मालिकेतील संबळ वाजवणाऱ्या मुक्ताची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. पण, वर्षभरात ही मालिका गुंडाळण्यात आली. ७ ऑक्टोबर २०२३ला ‘दार उघड बये’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. आता याच मालिकेतील मुक्ता म्हणजे अभिनेत्री सानिया चौधरी लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अभिनेत्री सानिया चौधरीने सोशल मीडियावर काही तासांपूर्वी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून सानियाने लवकरच नव्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगितलं आहे. सानिया ‘पुण्यश्लोक’ या भव्य दिव्य महानाट्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवींची भूमिका साकारणार आहे. याच नाटकाच पोस्टर शेअर करत सानियाने लिहिलं आहे, “महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आज नवीन सुरुवात करत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या ३००व्या जयंती निमित्त त्यांची व्यक्तिरेखा साकारायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते.”
‘पुण्यश्लोक ‘हे महानाट्य लवकरच मराठी रंगभूमीवर येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षा निमित्ताने सादर करत असलेल्या या महानाट्याचं दिग्दर्शन गणेश इनामदार यांनी केलं आहे. या महानाट्यात सानिया महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्यानिमित्ताने इतर कलाकार मंडळी आणि चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, सानिया चौधरीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘दार उघड बये’ आधी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘सांग तू आहेस का?’ या मालिकेत सानिया मुख्य भूमिकेत झळकली होती. या मालिकेत ती अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे यांच्याबरोबर झळकली होती. तसंच ‘साजणा’ या मालिकेत सानिया पाहायला मिळाली होती.