Zee Marathi Awards 2025 Promo : किरण गायकवाड मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘झी मराठी’वरील ‘देवमाणूस’ मालिकेतून झळकत आहे. अशातच आता ‘झी मराठी अवॉर्ड २०२५’निमित्त पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर पहिल्यांदाच किरणची आई शकुंतला गायकवाड यांनी हजेरी लावली आहे.

वाहिनीने सोशल मीडिया पेजवरून शेअर केलेल्या प्रोमोमधून पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर किरणला भेटायला त्याची आई आल्याचं पाहायला मिळतं. यावेळी त्यांनी किरणबद्दल, त्याच्या नावाबद्दल सांगितल्याचं दिसतं. वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवरून शेअर करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या प्रोमोला “चक्क देवमाणसाची आई मंचावर येणार, सोहळा स्वप्नांचा रंगणार!” अशी कॅप्शन दिली आहे.

किरण गायकवाडच्या आईची प्रतिक्रिया

समोर आलेल्या या प्रोमोमध्ये किरणची आई शकुंतला गायकवाड यांचा एक व्हिडीओ पाहायला मिळतो, ज्यामध्ये त्या “मी ठरवलं होतं की मुलगी झाली तरी किरण नाव ठेवणार आणि मुलगा झाला तरी किरणच नाव ठेवणार,” असं म्हणताना दिसतात. हे ऐकून किरण भावूक होताना दिसतो. पुढे प्रोमोमध्ये त्यांची मंचावर एन्ट्री झालेली पाहायला मिळते आणि यावेळी त्या “मी काय शाळा शिकलेली नाहीये, पण मला आण्णा नाईकबरोबर काम करायचं आहे,” असं म्हणतात. यावेळी तिथे उपस्थित असलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर “बरोबर बोललात तुम्ही, आम्हाला खूप आवडलं” असं म्हणतो. यावर किरणची आई त्याला, “बस, तुम्हाला आवडलं ना” असं गमतीशीर उत्तर देतात.

‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ हा पुरस्कार सोहळा ११ आणि १२ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता ‘झी मराठी’वर प्रेक्षकांना पाहता येईल. यावेळी पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदाच वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या किरण गायकवाडची आई येणार असल्याचं पाहायला मिळणार असून त्यामुळे पुरस्कार सोहळ्यादरम्यान किरणची आई त्याच्याबद्दल अजून कोणत्या गोष्टी सांगणार, तसेच त्यांच्या येण्याने सोहळ्याला कोणती नवीन रंगत येणार हे पाहणं रंजक ठरेल.

दरम्यान, किरण गायकवाड सध्या ‘देवमाणूस’ मालिकेत खलनायकाची मुख्य भूमिका साकारत असून ‘देवमाणूस’ या मालिकेच्या या पर्वालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्याने यामधून त्याच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. ‘झी मराठी’वरील ‘लागीरं झालं जी’ मालिकेतूनच किरणने मालिकाविश्वात पदार्पण केलेलं. त्यानंतर तो ‘देवमाणूस’मधून प्रेक्षकांसमोर आला. याबद्दल त्याने एका मुलाखतीतही सांगितलं होतं, त्यामुळे एकूणच किरणसाठी ‘झी मराठी’ खूप खास ठरली असून आता पहिल्यांदच किरणची आईसुद्धा प्रेक्षकांसमोर येणार आहे.