Kiran Gaikwad Talks About Dream Home : किरण गायकवाड मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेतून पाहायला मिळत आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे किरण खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अशातच आता अभिनेत्यानं त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं आहे.

‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ या सोहळ्यानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी अनेक किस्से, गमती-जमती सांगितल्या आहेत. अशातच आता किरणनंही त्याच्या एका खास स्वप्नाबद्दल सांगितलं आहे. किरणनं यावेळी त्याच्या स्वप्नातल्या घराबद्दल सांगितलं आहे. यावेळी संवाद साधताना किरण म्हणाला, “गाव म्हटलं की, हल्ली माझ्या डोळ्यांसमोर कोकण येतं.”

किरणला कोकणात बांधायचं ड्रीम होम

किरणनं पुढे त्याला कोकणात त्याच्या स्वप्नातलं घर बांधायचं आहे याबद्दल सांगितलं आहे. किरण याबद्दल म्हणाला, “मला कोकणात एक ड्रीम होम बांधायचं आहे. खरं तर मी निसर्गाचे खूप आभार मानतो की, निसर्गानं खूप दिलंय आपल्याला आणि मी निसर्गप्रेमी आहे. माझी अशी इच्छा आहे की, मला झाडं लावायची आहेत. मी ते सगळं भविष्यात करणार आहे.”

किरणनं त्याला कोकणात घर बांधायचं असून, त्याच्या निसर्गप्रेमाबद्दल सांगितलं आहे. किरणची बायको म्हणजेच अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर ही मूळची कोकणातली आहे. किरण अनेकदा तिच्याबरोबर कोकणात जात असतो. दोघे सोशल मीडियावर तिथले फोटो व व्हिडीओ पोस्ट करीत असतात.

किरण व वैष्णवी हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. दोघे जण अनेकदा एकमेकांबरोबरच्या रील सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. किरण व वैष्णवी यांनी ‘देवमाणूस’ मालिकेच्या एका पर्वात एकत्र कामही केलं होतं. त्यानंतर हे दोघे पुन्हा एकत्र स्क्रीनवर झळकले नाहीत. वैष्णवी सध्या तिची नवीन मालिका ‘काजळमाया’मुळे चर्चेत आहे. त्यामध्ये ती अभिनेता अक्षय केळकरबरोबर झळकणार आहे. लवकरच ही मालिका सुरू होणार आहे.

दरम्यान, किरणबद्दल बोलायचं झालं, तर किरणनं आजवर अनेक मालिका, चित्रपटांत काम केलं आहे. ‘झी मराठी’वरील मालिकेतूनच त्यानं मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं आणि आता तो मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा बनला आहे.