Dhananjay Powar & Ankita Walawalkar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर या भावा-बहिणीची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताने डीपी दादाला राखी बांधली होती. यानंतर शो संपल्यावर अंकिता व डीपी दादांनी भाऊबीज सुद्धा साजरी केली होती.
अंकिता व धनंजय या भावा-बहिणीची जोडी कायम चर्चेत असते. या दोघांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “यंदा डीपी दादांनी भाऊबीजेला फोन केला नाही” अशी पोस्ट शेअर करत अंकिताने खंत व्यक्त केली आहे.
अंकिता म्हणते, “धनंजय पोवार या माझ्या भावाने मला भाऊबीजेच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत… भाऊबीजेला भावाने बहिणीकडे यायचं असतं पण, यायला नाही जमलं तर एक कॉल तरी?”
अंकिताची ही स्टोरी रिशेअर करत धनंजय म्हणतो, “भाऊ दिवाळीच्या व्यापारात व्यग्र होता वाटलं होतं बहिणीने समजून घेतले असेल पण, आता हीच माझी एक चूक समजून तुला लवकरच गिफ्ट देईन ते तुला नक्कीच आवडेल. विसरलो नक्कीच नाही… तरी चुकलो असेन तर माफ कर…” डीपी दादांनी लाडक्या बहिणीची माफी मागून लवकरच गिफ्ट देईन असं प्रॉमिस अंकिताला केलं आहे.

दरम्यान, या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर धनंजय पोवार काही दिवसांपूर्वीच ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात सहभागी झाला होता. हा शो संपल्यावर त्यांनी गॉगल-चष्मा विक्रीचा नवीन व्यवसाय सुरू करत त्याच्या पहिल्या दुकानाचं दणक्यात उद्घाटन केलं. तर अंकिता अनेक सामाजिक कामांसाठी पुढाकार घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय ‘कोकण हार्टेड गर्ल’ने काही दिवसांपूर्वीच सूरज चव्हाणच्या घरी भेट दिली होती. यावेळी सूरजने त्याच्या होणाऱ्या पत्नीची ओळख अंकिताशी करून दिल्याचं पाहायला मिळालं होतं.
