Dhananjay Powar Supports Pranit More : ‘बिग बॉस’चं यंदाचं १९ वं पर्व असून, या पर्वाला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीपासूनच शोची आणि शोमधील स्पर्धकांची सर्वत्र चर्चा सुरू होती. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वात कलाकार, गायक व सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सही सहभागी झाले आहेत. त्यात मराठमोळा कॉमेडियन प्रणीत मोरेही आहे.
‘बिग बॉस १९’ सुरू होऊन आता जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत आणि पहिल्या दिवसापासूनच प्रणीतचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला बाहेर त्याच्या चाहत्यांसह तसेच अनेक कलाकार मंडळींकडूनसुद्धा पाठिंबा मिळताना दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी ५’फेम धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर त्याच्या पाठीशी उभे आहेत.
अशातच धनंजय पोवारनं नुकताच प्रणीतला पाठिंबा दर्शविणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात व्हिडीओद्वारे त्यानं प्रणीतच्या खेळाचं कौतुक केलं आहे. तसेच त्याच्या दिसण्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. त्याचबरोबर त्यानं बसीरच्या एलिमिनेशनवरसुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नव्हे, तर मराठी इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी प्रणीतच्या पाठीशी उभं राहावं, अशी मागणीसुद्धा धनंजयनं या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.
या व्हिडीओत धनंजय म्हणतो, “इथे कुणालाच हलक्यात घ्यायचं नाही. महाराष्ट्रातल्या लोकांनी एकदा ठरवलं की, ते कुणालाही सोडत नाहीत. मला अनेकांचे मेसेजेस आले, की तू फक्त मराठी-मराठी का करत आहेस? आणि दुर्दैवानं हे बोलणारे स्वत: सगळे मराठीच आहेत. बोटांवर मोजण्याइतकेच हे लोक आहेत; पण तरी ही मोठी खंत आहे. माझं म्हणणं आहे की, तुमची विचारसरणी जर सूडबुद्धीची असेल, तर तुम्ही दुसऱ्यासमोर ज्ञान पाजळून त्याची बुद्धी का भ्रष्ट करीत आहात? प्रणीत मराठी आहे म्हणूनच त्याला आम्ही सपोर्ट करतोय का? तर नाही. ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर त्याला हडतुड केलं गेलं. त्याच्या दिसण्यावरून बोललं गेलं. तो गावातून आला आहे, असं म्हटलं गेलं. मराठी म्हणून त्याला अशी वागणूक मिळत असेल, तर आम्ही प्रणीतच्या पाठीशी आहोत. त्याच्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू.”
त्यानंतर धनंजय म्हणतो, ” ‘बिग बॉस’च्या घरात तो टास्क उत्तम खेळत आहे. त्याचं वागणं-बोलणं चांगलं आहे. तो स्ट्रॅटेजी प्लॅन करून सगळे खेळ उत्तम खेळत आहे. मग अजून काय पाहिजे… आम्ही त्या घरात राहून आलो आहोत. त्यामुळे तुम्हाला त्या घरात सतत काही ना काही करावं लागतं.”
पुढे धनंजय बसीरच्या एविक्शनबद्दल म्हणतो, “आता त्या घरातला बसीरचा खेळ संपला आहे. बसीर, आता तू घरी जाऊन तोंड वगैरे धू आणि सगळ्यात आधी कपडे घाल. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तरी उघडा फिरू नकोस. आता तू घरातून बाहेर पडला आहेस. त्यामुळे तुझं आणि आमचं वैर संपलं आहे. एखाद्यावर अन्याय झाला, तर आम्ही त्याच्या मागे नक्कीच उभे राहणार. इन्फ्लूएन्सर्स लोकांचे मी आभार मानतो. त्या सगळ्यांनी व्हिडीओद्वारे प्रणीतला पाठिंबा दिला. मराठी लोक दिसले की, हे आम्हाला कमी लेखतात.”
धनंजयनं व्हिडीओ शेअर करीत दिला प्रणीतला पाठिंबा
त्यानंतर धनंजय सर्वांना आवाहन करीत म्हणतो, “मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांनीसुद्धा प्रणीतच्या मागे उभं राहिलं पाहिजे. तुमच्या सोशल मीडियाद्वारे तुम्ही त्याला पाठिंबा दर्शवला पाहिजे. कळू द्या. आपल्या मराठी इंडस्ट्रीला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. प्रणीतनं ट्रॉफी जिंकणं म्हणजे आपणच जिंकल्यासारखं आहे आणि हा महाराष्ट्रच आपलं घर आहे. तो जिंकला, तर ती ट्रॉफी आपल्या महाराष्ट्रातच येणार आहे. प्रणीत मोरे, भाई नड! इथं आम्ही छाती ठोकून बसलोय. तू बिनधास्त खेळ, आम्ही आहोत. आपले सिनेमे चालत नाहीत. आपल्याला थिएटर्स मिळत नाहीत. त्यासाठी आपण आपली एकजूट दाखवली पाहिजे. आज वेळ आहे. मराठी लोक एकत्र आले, तर आपण कुठल्या कुठे जाऊ.”
