अभिनेत्री दिशा परदेशी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने तुळजा हे पात्र साकारलं होतं. अभिनेता नितीश चव्हाणसह ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. मुख्य नायिका म्हणून दिशाची ही पहिलीच मालिका होती. परंतु, दिशाने काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून एक्झिट घेतली. तिच्यानंतर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर तुळजा ही भूमिका साकारत आहे.

दिशा परदेशीची मालिकेतून एक्झिट झाल्यानंतर अनेकांनी तिला मालिका सोडण्यामागचं कारण विचारलं होतं. त्यावर तिने आरोग्याच्या समस्यांमुळे मालिका सोडल्याचं सांगितलं होतं. अशातच आता मालिका सोडल्यानंतरच्या तीन महिन्यांनी दिशाने ही मालिका सोडण्यामागचं कारण तसेच तिच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. दिशाने ‘राजश्री मराठी शोबझ’ला नुकतीच मुलाखत दिली.

‘राजश्री मराठी शोबझ’ला दिलेल्या मुलाखतीत दिशा म्हणाली, “मनावर दगड ठेवून मला मालिका सोडवी लागली. मला जो आजार झाला आहे, त्यामुळे डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला होता. मी खूप प्रयत्न केले, पण आराजारामुळे माझ्या तब्येतीवरही परिणाम झाले. माझं वजन खूप कमी झालं. जेव्हा मी हे आमच्या निर्मात्या श्वेता शिंदेंना सांगितलं, तेव्हा त्या मला आपण साताऱ्यातील चांगल्या डॉक्टरांना दाखवू, होईल सगळं ठीक असं म्हणाल्या; पण मी त्यांना जर नाही झालं तर काय असं म्हटलं, कारण माझ्या डॉक्टरांनी मला जर आता काळजी नाही घेतली तर पुढे हा आजार वाढू शकतो, ज्याचा मला खूप जास्त त्रास होईल असं सांगितलं होतं.”

“निर्मात्यांनी व वाहिनीने मला सांभाळून घेतलं, पण शेवटी आरोग्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नव्हतं, त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला.” दिशाने तिला झालेल्या आजाराबद्दलही सांगितलं आहे. ती म्हणाली, “मला यू.टी.आय. नावाचा आजार झाला आहे. हा महिलांचा आजार आहे, यामुळे वजन खूप कमी होतं आणि तब्येतीवरही परिणाम होतो. या आजाराबद्दल बऱ्याच महिलांना माहिती नाहीये, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना या आजाराबद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे.”

दरम्यान, दिशा परदेशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने यापूर्वी ‘स्टार प्रवाह’वरील ‘स्वाभिमान’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती; यासह तिने ‘प्रेम पहिलं वहिलं’, ‘मनफकिरा’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे.