‘एक हजारों में मेरी बहना है’ फेम अभिनेता करण टॅकर ३९ वर्षांचा आहे. त्याने अद्याप लग्न केलेलं नाही. तो आई-वडिलांबरोबर राहतो. करणच्या घरी नुकतीच फराह खान व तिचा कूक दिलीप गेले होते. फराह खानने करण व त्याच्या कुटुंबाशी गप्पा मारल्या. जेवणाचा आस्वाद घेतला आणि करणला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्नही विचारले.
फराह खान व दिलीप यांचे करणने स्वागत केले. करणच्या घरात जाताच फराहने त्याला विचारलं की हे घर कोणाचं आहे. यावर कुटुंबाचं असं उत्तर करणने दिलं. मग फराह म्हणाली, “म्हणजे तुझ्या आई-वडिलांचं आहे, बरोबर ना. मग तू मुलींना घरी कसं आणतोस?” यावर करणने सांगितलं की ते आम्ही परस्पर समजून घेतो.
दिलीप म्हणतो की त्यालाही या संभाषणात सहभागी व्हायचंय. यावर फराह त्याला चिडवत म्हणाली, “का, तुझा घटस्फोट झालाय ना आणि तुला तर तीन मुलं आहेत.” हे ऐकताच करण हसू लागला. “फराहला कळू न देता घरी मुली कशा आणायच्या, ते तू शिकशील,” असं करण दिलीपला म्हणाला.
कुटुंबाबरोबर राहतो करण टॅकर
“आम्ही जेव्हा घर डिझाइन करत होतो, तेव्हाच ठरवलं होतं की आम्ही सर्वजण एकत्र राहू. माझं लग्न झालेलं नाही, त्यामुळे घरात दोन लिव्हिंग रूम्स आहेत. एक आई-वडिलांसाठी आणि एक माझ्यासाठी,” असं करणने सांगितलं. नंतर त्याने फराहच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.
“जेव्हा माझ्याबरोबर कोणी घरी येतं, तेव्हा मी फॅमिली ग्रुपवर मेसेज करतो की माझ्याबरोबर कोणीतरी आलंय. हा आमचा कोड वर्ड आहे. हा मेसेज केल्यानंतर ते तिकडेच राहतात, इकडे येत नाहीत. माझे आई-वडील कूल आहेत,” असं करण म्हणाला. यानंतर फराह दिलीपला म्हणते, “तू हा बकवास सल्ला ऐकू नकोस. तू कोणाला घरी बोलावणार आहेस?”
फराह करणला म्हणाली की तुझ्या वडिलांनी तुझ्या स्वयंपाकाचं कौतुक केलं होतं, त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत. करणचे वडील कुक्कू टॅकर हे अभिनेते होते, नंतर त्यांनी व्यवसाय सुरू केला. “मी बालपणी दूरदर्शनवर बिरबलची भूमिका करायचो. मला प्रत्येक एपिसोडसाठई १०० रुपये मिळायचे,” असं करणचे वडील म्हणाले. करणने जेव्हा अभिनयात करिअर करायचं ठरवलं, तेव्हा नाराज वडिलांनी त्याच्यावर भांडी फेकली होती, अशी आठवण त्याने सांगितली.
