Farah Khan’s mother in law complains about her: फराह खान बॉलीवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर व दिग्दर्शक आहे. त्याबरोबरच ती काही रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालनदेखील करते. टीव्हीबरोबरच अनेकदा फराह खान तिच्या यूट्यूबवरील व्हिडीओमुळे चर्चेत असते.

फराह खानचे स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे. तिच्या यूट्यूब व्लॉगमध्ये पाहायला मिळते की, ती अनेक लोकप्रिय कलाकारांच्या घरी जाते. त्या कलाकार एखादा खास खाद्यपदार्थ बनवत असेल, त्याबद्दल ती जाणून घेते. त्याची चव चाखते.

त्यानिमित्ताने टेलिव्हिजन आणि बॉलीवूडमधील अनेक कलाकारांची घरं कशी दिसतात, हेदेखील पाहायला मिळतं. यादरम्यान, फराह खान खासगी, तसेच व्यावसायिक आयुष्यातील काही आठवणीदेखील सांगतात. त्यामुळे तिच्या या यूट्यूब व्लॉगची मोठी चर्चा रंगताना दिसते.

“तर दररोज तुमच्या पाया…”

आता फराह खानच्या यूट्यूब व्लॉगमध्ये तिची सासू गीतांजली कुंदर यांनी हजेरी लावली होती. या व्हिडीओमधील फराह व गीतांजली कुंदर यांच्या गप्पांनी लक्ष वेधून घेतले. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, सासूचे स्वागत करीत फराह त्यांच्या पाया पडते. त्यावर तिची सासू हसत म्हणते की, गेल्या सहा महिन्यांत तू दुसऱ्यांदा पाया पडली आहेस. त्यावर फराह गमतीने म्हणते, “जर तुम्ही रोज घरी आलात, तर दररोज तुमच्या पाया पडू शकत नाही. मी तेव्हाच पाया पडेन, जेव्हा कॅमेरा सुरू असेल.” पुढे फराह खान असेही म्हणाली, “आता माझ्याकडे एकच आई आहे. प्रत्येक वेळी मी तिच्या पाया पडले पाहिजे.”

व्हिडीओमध्ये पुढे जेवण बनवण्यावरून फराह आणि गीतांजली कुंदर यांच्यात गप्पा रंगताना पाहायला मिळाल्या. गीतांजली मंगलोरियन फिश करी बनवीत असून, फराह त्यावर तक्रार करते की, हा पदार्थ मला कधीही तुम्ही बनवून दिला नाही. आमच्या लग्नाला २० वर्षं झाली आहेत. त्यावर गीतांजली तिला म्हणतात की, सुना सासूला जेवण बनवून देतात. कोणतीही सासू सुनेला का घरी आणते, तर घरातील सदस्यांसाठी तिने जेवण बनवावे, यासाठीच आणते. त्यावर फराह त्यांना म्हणते की,मुली स्वयंपाक करण्यासाठी लग्न करत नाहीत. सगळ्यांना थोडं थोडं जेवण बनवणे आले पाहिजे.

“तुमचा मुलगा वाईट आहे; पण…”

पुढे गीतांजली म्हणतात की, सासू आणि सुनेने कधीही एकत्र किचनमध्ये यायला नाही पाहिजे. त्यावर फराह खान सहमती दर्शवते. पुढे ती गमतीने म्हणते की, तुम्ही स्वयंपाक बनवा. मी बाहेर जाते आणि लिंबू सरबत पिते.

फराह तिच्या सासूला म्हणते की, आपण बनवत असलेल्या जेवणाची चव चांगली असली किंवा वाईट असली तरी पाहणाऱ्यांना ते कळत नाही. त्याचे उदाहरण देताना ती तिच्या सासूला म्हणते की, तुमचा मुलगा वाईट आहे; पण मी त्याला चांगलेच म्हणते ना? त्यावर तिची सासू तिला म्हणते की, तू माझ्या मुलाला वाईटच म्हणतेस.

फराह खान सेलब्रिटी मास्टरशेफमध्ये एकदा म्हणाली होती की, माझ्या सासूने मला आजपर्यंत कोणताही पदार्थ स्वत: करून खाण्यासाठी दिला नाही. ती फक्त तिच्या मुलासाठी जेवण बनवते. आता हा एपिसोड पाहिल्यानंतर ती मला म्हणेल की, तुला माझ्या हातचे जेवण आवडत नाही म्हणून मी तुझ्यासाठी काही बनवत नाही.

दरम्यान, फराह खान आणि शिरीष कुंदर यांनी २००४ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना तीन मुले आहेत.